प्रदीपच्या हत्येचे गूढ उकलले; एक संशयित ताब्यात File Photo
छत्रपती संभाजीनगर

प्रदीपच्या हत्येचे गूढ उकलले; एक संशयित ताब्यात

तीन दिवस अनेकांच्या कसून चौकशीनंतर एकजण हाती लागला

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

बीसीएसचा विद्यार्थी प्रदीप निपटे याची उस्मानपुऱ्याच्या म्हाडा कॉलनीतील फ्लॅटमध्ये मंगळवारी रात्री अज्ञाताने तब्बल १७ वार करून निर्घृण हत्या केली होती. या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतर अखेर पोलिसांनी एका संशयिताला आज (शुक्रवार) (दि.१७) मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. उस्मानपुरा पोलिसांसह गुन्हे शाखा, विविध ठाण्यातील अनुभवी अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, जुन्या भांडणातून हत्या झाल्याचा अंदाज पोलिस सूत्रांनी वर्तविला असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.

मूळ बीड जिल्ह्यातील वडवणीजवळील पिंपरखेड गावाचा प्रदीप प्रदीप विश्वनाथ निपटे (वय १९) हा सहा महिन्यापूर्वी देवगिरी महाविद्यालयात बीसीएसला प्रवेश घेऊन शहरात आला. तो देशमेशनगर येथे काही मित्रांसोबत राहिला. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२४ रोजी तो उस्मानपुरा भागातील म्हाडा कॉलनीत नातेवाईक अमर शिंदे, अर्जुन कवचट आणि अभिषेक लव्हाळे, महेश चव्हाण या चौघांसोबत फ्लॅटमध्ये राहण्यास आला होता. मकर संक्रातीच्या दिवशी त्याची खोलीवर एकटा असताना पाठीवर १०, गळ्यावर ३, हातावर २, मानेवर, छातीवर असे १७ हुन अधिक वार करून हत्या झाली. मारेकऱ्याने त्याचा मोबाईल सोबत नेला असल्याने त्या एका धाग्यावर पोलिस अपेक्षा ठेऊन होते.

मित्रांसह कॉल डिटेल्सनुसार सर्वांची कसून चौकशी

बुधवारी दिवसभर मित्रांसह संशियितांची चौकशी करूनही पोलिसांच्या हाती ठोस काही लागले नव्हते. गुरुवारी (दि.१६) पुन्हा सकाळपासून सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील, निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक शिवाजी चौरे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक वाघ यांनी रूम पार्टनर, कॉलेजचे मित्र, भांडण झालेले तरुण, दशमेश नगर येथील जुने रूम पार्टनर यांची रात्रीपर्यंत चौकशी करत होते. प्रदीपच्या मोबाईलचा सीडीआर काढण्यात आला असून त्याच्या सर्व कॉल डिटेल्स तपासून सर्वाना चौकशीसाठी ठाण्यात बोलाविण्यात आले होते. त्यातून एक धागा हाती लागला अन संशयित ताब्यात घेण्यात आला. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT