Muslim youth rescue Hindu priests trapped in flood
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : शहराजवळील शिवना नदीकाठी स्थित लंगोटी महादेव मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने मंदिरातील पुजारी आणि त्यांचे कुटुंब अडकले होते. संकटावेळी शेजारी राहणाऱ्या मुस्लिम तरुणांनी जात, धर्म, पंथ न पाहता मदतीस धाव घेत पुजारी व त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे.
शहरातील शिवनगर भागाजवळून वाहणाऱ्या शिवना नदीच्या दुसऱ्या काठी असलेल्या शेतात लंगोटी महादेव मंदिर आहे. या मंदिरात दिलीप गिरी हे पुजारी असून, त्यांच्यासह त्यांच्या दोन भावंडांचे कुटुंबही मंदिरात वास्तव्यास आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंदिर परिसराला पाण्याचा वेढा पडला आणि एकूण सहा जण अडकले.
यावेळी फैजल हसन पठाण, सलमान पठाण, अझर पठाण, फैयाज पठाण, सोनू लाल पठाण, विलास बाबूराव जाधव, अय्याज हसन पठाण व अनिस सलीम पठाण या तरुणांनी धाडस दाखवत पाण्यात उतरले. त्यांनी पुजारी व त्यांच्या कुटुंबाला स्वतःच्या खांद्यावर उचलून सुरक्षित स्थळी पोहोचवले.