land excavation stone mafia Dwala village Vaijapur taluka
नितीन थोरात
वैजापूर : मराठवाड्यात दिवसेंदिवस माफियांचा दबदबा वाढत चालला आहे. गुटखा, वाळू, राख माफियानंतर आता मुरूम माफिया पुन्हा चर्चेत आले असून, वैजापूर तालुक्यातील डवाळा गावात त्यांनी अक्षरशः गायरान जमिनींची चाळणी केली आहे. तब्बल २३ एकर क्षेत्रफळावर मुरूम उत्खनन करण्यात आले असून, हे सर्व काम खुलेआम आणि बिनधास्तपणे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
तर याच ठिकाणी एमएसआरडीसीकडून नागरिकांच्या हितासाठी उभारण्यात आलेली शेततळीही जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या उत्खननामुळे गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्ता खराब झाल्याने एका नागरिकाचा अपघाती मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप आमदार रमेश बोरणारे यांनी केला आहे. गावकरी सांगतात की, या माफियांमुळे गावात अनेकदा वाद झाले. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच ठोस कारवाई न झाल्यामुळे माफियांचे मनोबल वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एवढेच नाही, तर ५० फुटांपर्यंत खोल खड्डे खोदण्यात आल्याने परिसर धोकादायक बनला आहे.
या आधीही वाळूमाफियांच्या दहशतीमुळे उपविभागीय अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला होता. तर या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच आता मुरूम माफियांकडून गायरान जमिनीवर थेट दिवसा ढवळ्या लूट सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आमदार बोरणारे यांनी याप्रकरणी तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
66 अधिकाऱ्यांना सूचना आहे. अशा मुजोर माफियांना पाठीशी घालू नका, त्यांच्यावर कठोर कारवाई करा. २३ एकरा-वरील मुरूम एका दिवसात उत्खनन होऊ शकत नाही. त्यामुळे हे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय झालेले नाही. दुसरी महत्त्वाची वाब म्हणजे या माफियांमुळे खराब झालेल्या रस्त्यामुळे एका जणाचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे.प्रा रमेश बोरनारे, आमदार, वैजापूर.
तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. अहवाल प्राप्त होताच योग्य ती केली जाईल.- डॉ. अरुण जन्हाड, उपविभागीय अधिकारी वैजापूर-गंगापूर
66 गेल्या काही दिवसांपासून डवाळा गावात हे अवैध उत्खनन सुरू असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केली आहे. स्थानिक महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या आहेत. असे असताना दखल न घेतल्यामुळे या जमिनीची अक्षरशः चाळणी झाली आहे.