Crime News : गोव्याला क्रूझवर वाढदिवस साजरा करण्यासाठी 'त्या' व्यावसायिकाची हत्या file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : गोव्याला क्रूझवर वाढदिवस साजरा करण्यासाठी 'त्या' व्यावसायिकाची हत्या

कुख्यात 'मुक्या'सह साथीदाराला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

Murder of 'that' businessman who went to Goa to celebrate his birthday on a cruise

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दिवसंरात्र अत्यंत वर्दळीच्या जालना रोडवर मोकाट फिरणाऱ्या गुन्हेगारांनी अब्दुल बासित हकीम खान (६४, रा. कैसर कॉलनी) या स्क्रॅप व्यावसायिकाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, स्वतःचा वाढदिवस गोव्याला क्रूझवर जल्लोषात साजरा करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करताना कुख्यात गुन्हेगार मुकेश ऊर्फ मुक्या महेंद्र साळवे (२९, रा. मुकुंदवाडी) याने साथीदार विक्की ऊर्फ सोनू मधुकर पाचवणे (२२, रा. अंबिकानगर) याच्या मदतीने हा खून केल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीचेही धिंडवडे निघाले असून, सर्वसामान्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने ८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. वाढदिवसाच्या दिवशीच मुक्याच्या हातात बेड्या पडल्या, मात्र निष्पाप व्यावसायिकाचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

कुख्यात मुक्या साळवे याचा शुक्रवारी (दि.३) वाढदिवस होता. हा वाढदिवस आपल्या टोळीला सोबत घेऊन गोव्याला एका आलिशान क्रूझवर साजरा करण्याचा त्याचा प्लॅन होता. या ट्रिपला लागणाऱ्या पैशांसाठी तो गेल्या आठ दिवसांपासून सावजाच्या शोधात होता. हत्येच्या रात्री (गुरुवारी) मुक्या आणि विक्की हे दोघे प्रथम रेल्वेस्टेशन परिसरात गेले. तिथे त्यांनी एका झोपलेल्या प्रवाशाची बॅग पळवली. मात्र त्यात जास्त काही न मिळाल्याने ते पुन्हा दुचाकीवरून क्रांती चौकमार्गे सिडकोकडे नवे सावज शोधण्यासाठी निघाले होते.

आकाशवाणी चौक ओलांडताच या दोघांना पायी जाणारे अब्दुल बासित दिसले. त्यांनी बासित यांना अडवून पैशांची मागणी केली. बासित यांनी पैसे देण्यास नकार देताच आरोपींनी त्यांना मारहाण सुरू केली. यावेळी झटापट होताच मुक्याने त्यांच्या मांडीत चाकू खुपसला. त्यांचा मोबाईल घेऊन सेंट्रल नाका, कॅनॉट आणि सिडको उड्डाणपूल ओलांडून मुकुंदवाडीच्या दिशेने पसार झाले होते.

निष्पाप व्यावसायिकाचा बळी ? नागरिकांत संताप

महिनाभरापूर्वी सुटून आल्यानंतर मुक्याने थेट क्रूझवरील पार्टीसाठी निष्पाप व्यावसायिकाचा बळी घेतल्याचे समोर आले आहे. जालना रोडसारख्या शहरातील सर्वात वर्दळीच्या मार्गावर मध्यरात्री खुलेआम गुन्हेगार लुटमारीच्या उद्देशाने फिरत होते. रेल्वेस्टेशनवर चोरी केल्यानंतर ते क्रांती चौक ते सिडको असा प्रवास करतात आणि एका व्यावसायिकाची भररस्त्यात हत्या करतात. या सर्व प्रकारामुळे 'पोलिसांची रात्रीची गस्त नेमकी कुठे सुरू असते?' असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. मोकाट फिरणाऱ्या गुन्हेगारांमुळे शहरात दहशतीचे वातावरण असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोक्कातून सुटताच पुन्हा रक्ताचा खेळ

मुकेश ऊर्फ मुक्या साळवे हा सराईत गुन्हेगार असून, तो स्वतःची टोळी चालवतो. त्याच्यावर १८ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी त्याच्यावर 'मोक्का' अंतर्गत कारवाई करत त्याची रवानगी मुंबईच्या कारागृहात केली होती. काही महिन्यांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता. जेलमधून बाहेर येताच ८ मे रोजी त्याने एका डिलिव्हरी बॉयलाही चाकूचा धाक दाखवून लुटले होते. त्यानंतर पुन्हा जेलमध्ये गेला होता.

१०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त शशिकांत सातव, रत्नाकर नवले, एसीपी अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम, अभिजित चिखलीकर, हवालदार राजेंद्र साळुंके, श्रीकांत काळे, योगेश गुप्ता, मनोहर गीते, विक्रम खंडागळे, अमोल मुगळे, गावंडे, पांढरे, डाकुरे, सागरे, यांनी घटनास्थळ आणि परिसरातील १०० सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघांनाही बेड्या ठोकल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT