Municipal Election: Meetings, rallies, and marches in support of BJP candidates
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी रविवारी (दि.११) चा दिवस प्रचाराचा सुपर संडे ठरला. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री बी. एल. संतोष, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग १६, १८, १९, २२ मध्ये सलग रॅली, प्रचार बैठका, नागरिकांशी संवाद साधला. तसेच राष्ट्रसंत कुंथूसागरजी गुरुदेव व राष्ट्रसंत आचार्य श्री १०८ गुणधरनंदीजी गुरुदेव यांचा आशीर्वाद घेतला. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप उमेदवारांनाच निवडून देण्याचे आवाहन केले.
महापालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून, भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवार हा सुपर संडे ठरला. यावेळी भाजपकडून प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रच रारार्थ विद्यानगर, विजयनगर, गुरुदत्तनगर, शिवनेरी कॉलनी, गजानननगर, पुंडलिकनगर, न्यायनगर आदी परिसरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत पदाधिकारी व मतदार सहभागी होते.
रॅलीतील गर्दीने प्रत्येकाचे लक्ष वेधले. यावेळी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. ठिकठिकाणी रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसद मिळला. भाजप उमेदवारांना निवडून देत कमळ फुलवा आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले. त्यास मतदारांनीही साद दिली.
प्रभाग क्रमांक १६, १८ आणि १९ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी नागरिकांच्या बैठका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख करत शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
दरम्यान, प्रत्येक कार्यकर्त्याने बूथपातळीवर सक्रिय राहून उमेदवारांना विजयी करण्यासाठी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही सावे यांनी केले. एमजीएम कॅन्टीन परिसरात भाजप पदाधिकारी व उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधला. यात पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक या नागरी समस्यांवर नागरिकांनी मते मांडली. त्यावर मंत्री सावे यांनी या समस्यांवर उपाययोजनांची दिशा स्पष्ट केली.
यावेळी प्रभाग २२ मधील उमेदवार पुष्पा निरपगारे, अशोक दामले, सुवर्णा तुपे, लक्ष्मीकांत थेटे, प्रभाग १६ मधील उमेदवार संगीता सांगळे, राजू वाडेकर, आशा भालेराव, रामेश्वर भादवे तर प्रभाग १८ मधील मयूरी बरथुने, संजय बारवाल, मनीषा भन्साली, मनदीप परदेशी, तसेच प्रभाग १९ मधील उमेदवार चंद्रकांत हिवराळे, शिल्प- ाराणी वाडकर, शोभा बुरांडे, संजय जोशी यांचा सक्रिय सहभाग होता.
मातंग समाजाचा भाजपला पाठिंबा
भाजपला पाठिंबा देण्यासाठी क्रांतिगुरु लहुजी साळवे विकास परिषद व मातंग समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मंत्री अतुल सावे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, प्रा. संजय गायकवाड, उत्तम कांबळे, छाया खाजेकर, आशा जाधव, कल्पना त्रिभुवन, राजू खाजेकर, राजू भालेराव, प्रमोद कांबळे, संदीप मानकरे, योगेश दणके, राजेंद्र कांबळे, विलास खोतकर, शोभा कांबळे यांच्यासह नागरिकांशी उपस्थिती होती.
गुरुदेवांचे दर्शन बीड बायपास येथील जबींदा ग्राऊंडवर
कुंथूसागरजी गुरुदेव व राष्ट्रसंत आचार्य श्री १०८ गुणधरनंदीजी गुरुदेव यांच्या ऊर्जासंपन्न सान्निध्यात साधना व संगीत अमृत महा-महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला हजेरी लावत भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष, मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी गुरुदेवांचे दर्शन घेत प्रचाराच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात केली. यावेळी महावीर पाटणी यांची प्रमुख उपस्थिती होती.