Municipal Election: Campaign rallies of Fadnavis, Yogi, Thackeray, Pawar, and Owaisi will be held
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, शहरातील विविध प्रभागांमध्ये राजकीय पक्षांच्या पदयात्रा आणि छोट्याखानी सभा पार पडत आहेत. प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात बड्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार येत्या आठवड्यात एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी, शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच वंचितचे सुजात आंबेडकर यांच्या सभा आणि पदयात्रा होणार आहेत.
महापालिकेच्या २९ प्रभागांतील ११५ वॉर्डाच्या निवडणूक प्रचार रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये सध्या स्थानिक नेत्यांनी पदयात्रा, कॉर्नर बैठकांवर जोर दिला आहे. यावेळी वॉर्डऐवजी प्रभागपद्धतीत निवडणुका होत आहेत.
त्यामुळे आता भाजपप्रमाणेच प्रत्येक पक्षाच्या पॅनलमधील उमेदवार सोबत प्रचारात फिरत आहेत. युती आघाडी ऐनवेळी फिसकटल्याने सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून आपापल्या बड्या नेत्यांच्या सभांचे नियोजन करण्यात येत आहे. यात सर्वप्रथम भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी (दि.५) सकाळी शहरात येणार आहेत. ते मतदारांशी संवाद साधणार आहेत.
यानंतर येत्या ७ जानेव-ारीला एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा होणार आहे. ८ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे, तर १० जानेवारी रोजी शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे यांची सांस्कृतिक मैदानावर सभा होणार आहे. यासोबतच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची १२ जानेवारी रोजी सभा होणार आहे.
नेत्यांच्या सभांनी चित्र बदलणार
महापालिका निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यापासून शहरात सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत. नेत्यांच्या सभांमुळे शहरातील रणधुमाळीत आणखीच शिगेल पोहोचणार आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात शहराच्या तापमानात वाढ होणार, असेच चित्र दिसत आहे.