HPV vaccination : एचपीव्ही लसीकरणासाठी मनपाची जनजागृती मोहीम file photo
छत्रपती संभाजीनगर

HPV Vaccination : एचपीव्ही लसीकरणासाठी मनपाची जनजागृती मोहीम

शिक्षक, प्राचार्यांसह पालकांचे समुपदेशन : अवघ्या २०० विद्यार्थ्यांना लस

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation’s awareness campaign for HPV vaccination

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एचपीव्ही प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला शहरात अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने महापालिका प्रशासनाने आता पालकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे. शहरातील १४ हजार विद्यार्थ्यांच्या तुलनेत आतापर्यंत केवळ २०० विद्यार्थ्यांचेच लसीकरण झाले आहे. त्यामुळे लसीबाबत पालकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करून त्यांना योग्य माहिती देण्यासाठी समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती शुक्रवारी (दि.२३) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.

एचपीव्ही म्हणजेच ह्युमन पॅपिलोमाव्हायरस या विषाणूच्या संसर्गापासून प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, लसीविषयी अपुरी माहिती आणि पालकांमधील विविध गैरसमज यांमुळे अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे केवळ लसीकरणाचे आवाहन करण्याऐवजी पालकांना विश्वासात घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यावर महापालिकेचा भर राहणार आहे.

या लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी शहरातील ३०० हून अधिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक, प्राचार्य आणि संस्थाचालकांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये एचपीव्ही लसीचे महत्त्व, तिचे फायदे आणि लसीकरणाची प्रक्रिया याबाबत माहिती दिली जाईल. त्यानंतर शाळांच्या माध्यमातून पालकांशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत लसीकरणासंदर्भातील योग्य माहिती पोहोचविण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिक्षक, प्राचार्य आणि संस्थाचालकांच्या सहकार्याने शाळांमार्फत जनजागृती करून पालकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लसीबाबतचे गैरसमज दूर करून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही मोहीम पोहोचविण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट असल्याचे महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, जननेंद्रियाचे मस्से, योनी, व्हल्वा, लिंग, गुद्द्वार तसेच तोंड आणि घशाच्या कर्करोगापासून ही लस संरक्षण करते. असे सांगण्यात येत आहे.

संमतीनंतरच लसीकरण

एचपीव्ही प्रतिबंधक लसीकरण ऐच्छिक असून, लस देण्यापूर्वी पालकांची संमती घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे पालकांना लसीविषयी सविस्तर माहिती देणे आणि त्यांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक आहे. पालकांना योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेता यावा, यासाठी समुपदेशन केले जाणार असल्याचे आयुक्त येडगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT