Municipal Corporation now processes waste scientifically
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मनपाकडून आता वैज्ञानिक पद्धतीने कचरा प्रक्रिया करण्यात येणार असून, प्लास्टिक व इतर सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया व पुनर्निर्मिती करण्यासाठी शहरातील तीन ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या साहित्य पुर्नप्राप्ती ( एमआरएफ सेंटर्स) केंद्रच्या उभारणीला वेग आला असून, सेंट्रल नाका, चिकलठाणा व कांचनवाडीत ही अत्याधुनिक केंद्रे उभारण्यात येत आहेत. IHIKES
शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम व शास्त्रशुद्ध पध्दतीने करण्याच्या दिशेने मनपाने पावले उचलली असून, सुक्या व प्लास्टिक कचऱ्याच्या जलद आणि कार्यक्षम प्रक्रियेसाठी सेंट्रल नाका, चिकलठाणा एमआयडीसी आणि कांचनवाडी भागात सुरू असलेले एमआरएफ सेंटर्सचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
या केंद्रांवर प्लास्टिक व इतर सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया व पुनर्निर्मिती करण्यासाठी ट्रामेल मशीन, बलिंग मशीन, झटक मशीन, आरडीएफ ब्रिकेट मशीन, श्रेडर मशीन आणि कन्वेअर्स अशी आधुनिक यंत्रे बसविण्यात येणार आहेत. संपूर्ण यंत्रसामग्रीची निर्मिती व उपलब्धता सुनिश्चित करण्याचे काम नाशिक येथील कंपनीला देण्यात आले आहे.
याकामाच्या यंत्रनिर्मितीला सुरुवात झाली असून, मनपाचे कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) अमोल कुलकर्णी आणि कनिष्ठ अभियंता प्रवीण वाघमारे यांनी कंपनीला भेट देऊन उत्पादन प्रक्रियेची पाहणी केली. ही संपूर्ण यंत्रसामग्री डिसेंबर अखेरपर्यंत मनपाच्या ताब्यात येण्याची शक्यता असून, प्रत्यक्ष कार्य २६ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले.
स्वच्छता व्यवस्थापनात वाढणार गुणवत्ता
या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थापनात गुणवत्ता वाढणार असून, पर्यावरण संवर्धन, पुनर्निर्मिती आणि प्लास्टिक कचऱ्याच्या प्रभावी हाताळणीत निर्णायक बदल घडून येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या एमआरएफ सेंटर्समध्ये प्लास्टिकपासून प्लास्टिक गोल्या (पेललेट्स), प्लास्टिक गाठी तसेच थर्मल इंडस्ट्रीमध्ये वापरले जाणारे आरडीएफ ब्रिकेट्स तयार करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेने शहरातील प्लास्टिक प्रदूषण नियंत्रणात येणार असून, पुनर्वापर उद्योगाला चालना मिळणार आहे.