Municipal Corporation neglects hydraulic testing of new water pipeline
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन २५०० मिमी व्यासाच्या पाणीपुरवठा योजन-`चा पहिला टप्पा येत्या महिनाभरात पूर्ण होणार आहे. डिसेंबरपासून त्यातून २०० एमएलडी पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी सध्या ठिकठिकाणी हायड्रोलिक चाचण्या सुरू आहेत. परंतु या प्रक्रियेकडे महापालिका पाणीपुरवठा विभागाचेच सपशेल दुर्लक्ष होत असून, चाचण्या नेमक्या योग्य होताय की नाही, याची माहितीच जर पाणीपुरवठा विभागाला नसेल तर पुढील ३० वर्षे या योजन- तून शहराला पाणी देणार तरी कसे, असा सवाल अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे उपस्थित होत आहे.
शहराला शहराला येत्या डिसेंबरपासून नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासक जी. श्रीकांत आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्याकडून सतत कंत्राटदार एजन्सीकडे पाठपुरावा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली डेडलाईन जवळ येत असल्याने मुख्य मुख्य अभियंता पलांडे यांनी बैठका घेत अधिकाऱ्यांकडून दररोजच्या कामाचा आढावा घेणे सुरू केला आहे. मुख्य जलवाहिनीच्या हायड्रोलिक चाचणीसोबतच शहराच्या विविध भागांत टाकण्यात आलेल्या अंतर्गत पाणीवितरणाच्या आणि पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्यांचीही चाचणी सध्या ठिकठिकाणी सुरू आहे.
चाचणीवेळी मनपा अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक
दरम्यान, महापालिका पाणीपुरवठा विभाग या योजनेतून शहरवासीयांना पाणीपुरवठा करणार आहे. त्यामुळे या योजनेच्या चाचण्या योग्यरीत्या होतात की नाही, याबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाने चाचणीच्या प्रक्रियेवेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने महापालिकेला जलवाहिन्यांच्या सक्षमतेबाबत काही देणे-घेणे नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने सेवानिवृत्त अधिकारी नियुक्त केले आहेत.