Municipal Corporation bulldozer on 920 plots in Padegaon-Mitmit
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: पडेगाव-मिटमिटा परिसरातील अनधिकृत प्लॉटिंगविरोधात महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई करून गुरुवारी (दि.२०) ९ अनधिकृत लेआउटमधील तब्बल २२० प्लॉटच्या खुणा तसेच इतर अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. महापालिकेच्या या कारवाईमुळे अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या जमीनमालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मुख्य अतिक्रमण सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी पडेगाव-मिटमिटा परिसरातील अवैध प्लॉटिंगवर कारवाई करण्यात आली. यावेळी गट क्रमांक १५६, १५८, ९८/२, ९९, १११, ११०, ११२ आणि ११३ या ठिकाणी विकसित करण्यात आलेल्या नऊ अनधिकृत लेआउटवर पथकाकडून बुलडोझर फिरवण्यात आला. तसेच सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता जमिनीवर प्लॉट पाडून त्यांची मार्किंग करण्यात आली होती.
यासह काही ठिकाणी अनधिकृत बांधकामेही उभारण्यात आली होती. मनपाच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने प्लॉटच्या खुणा व बांधकामे हटविली. परवानगीविना लेआउट तयार करून भूखंड पाडणे आणि त्यांची विक्री करणे हे नियमबाह्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या कारवाईत अतिक्रमण सहायक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक मुकेश खडसे, रवींद्र देसाई, नागरिक मित्र दल तसेच अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
संबंधितांवर कायदेशीर कारवाई
अनधिकृत प्लॉटिंग प्रकरणात शिवनाथ ताठे, भारूका, शेख रेहान अब्दुल रशीद आणि सय्यद खान यांची नावे समोर आली आहेत. संबंधितांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांना इशारा
सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता लेआउट तयार करून भूखंड पाडणे अथवा त्यांची विक्री करणे नियमांचे उल्लंघन आहे. अशा प्रकरणांत केवळ अनधिकृत प्लॉटिंग हटविण्यावर न थांबता संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. अनधिकृत प्लॉटिंगविरोधातील मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले.