सेंधवा येथील जामली टोल प्लाझाजवळ कंटेनरला धडकून चक्काचूर झालेली कार; या अपघातात गंगापूर व महालगाव येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला. Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Cricketers Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर कारचा भीषण अपघात; महालगाव-गंगापूरच्या क्रिकेटपटूंचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मध्यप्रदेशातील सेंधवा येथे कार-कंटेनरचा भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar Cricket Players Death News

गंगापूर : लेह-लडाखच्या रम्य सफरीची स्वप्ने डोळ्यांत साठवत गंगापूर आणि महालगाव परिसरातील चार जिवलग मित्र रविवारी (दि.३१) रात्री आनंदाने घरातून निघाले होते. मात्र नियतीने त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण दिले. मध्यप्रदेशातील सेंधवा येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (दि.१) पहाटे झालेल्या भीषण कार-कंटेनर अपघातात दोन उमदे युवा क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड गेले, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले.

या अपघातात महालगाव (ता. वैजापूर) येथील बद्रीनाथ ऊर्फ बद्री प्रमोद नांगरे (वय २६) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंगापूर येथील अनिकेत अनिल काळे (वय २९) यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज उपचारादरम्यान अपयशी ठरली. जखमी ओंकार साबणे आणि त्यांचा मित्र भूषण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत, बद्री, ओंकार आणि भूषण हे चौघेजण कारने लेह-लडाखच्या सफरीसाठी निघाले होते. सोमवारी सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास सेंधवा शहराजवळील जामली टोल प्लाझानजिक कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, डायल-११२ पथक आणि मदतकार्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र बद्री नांगरे यांचा जागीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी अनिकेत काळे यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली.

रविवारी रात्री घरातून निघताना कुटुंबीयांनी चारही मित्रांना आनंदाने निरोप दिला होता. लेह-लडाखच्या आठवणी घेऊन परत येऊ, असे सांगत निघालेल्या या तरुणांपैकी दोघे कायमचे निघून जातील, याची कल्पनाही कुणाला नव्हती. मात्र पहाटे आलेल्या एका दुःखद फोनने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली. आनंदाचे वातावरण क्षणार्धात दुःखाच्या काळोखात बुडाले.

बद्री नांगरे आणि अनिकेत काळे हे परिसरातील परिचित क्रिकेटपटू होते. मैदानावरील त्यांची जिद्द, खेळाप्रती असलेली निष्ठा आणि मित्रपरिवारातील त्यांचा हसतमुख स्वभाव यामुळे ते सर्वांचे लाडके बनले होते. त्यांच्या अकाली निधनाने क्रीडा क्षेत्रासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, दोन्ही तरुणांच्या पार्थिवावर सोमवारी त्यांच्या मूळ गावी संध्याकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असून गंगापूर व वैजापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

https://pudharinews.quintype.com/workspace/published

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT