वैजापूर : जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून यापूर्वी जिल्ह्यात चार ते पाच पतसंस्थांसह नागरी बँकांनी ठेवीदारांची फसवणूक करून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले होते.
दोन महिन्यांपूर्वी साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेची वैजापूर शाखा बंद पडल्याने खातेदारांमध्ये खळबळ उडाली होती. आता अखेर या प्रकरणात १६५ ठेवीदारांची ५ कोटी ८४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. दोन महिन्यांपूर्वी या पतसंस्थेत संस्थेच्या चेअरमन, संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून आर्थिक घोटाळा केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर फसवणूक झालेल्या शेकडो ग्राहकांनी आमदार रमेश बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली १९ मे रोजी वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करून आर्थिक रक्कम वसूल करण्याची मागणी केली.
दरम्यान, या प्रकरणात आर्थिक फसवणूक झालेल्या ग्राहकांची एकूण किती कोटींची फसवणूक झाली, यासाठी पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आता तब्बल एका महिन्यानंतर अखेर या प्रकरणात १६५ ठेवीदारांची ५ कोटी ८४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून, वैजापूर पोलिसांनी सदर गुन्हा दाखल करून तो छत्रपती संभाजीनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केला जाणार आहे.
उषा गणेश मोरे अध्यक्ष, सुशीला राजेंद्र म्हस्के (उपाध्यक्ष), गंगासागर अप्पासाहेब शेजवळ (सचिव), संचालक - कविता विष्णू सुरडकर, सरिता रामकिसन म्हस्के, सुजाता सतीश शेरखान, सविता गोकुळ मोर, मंजुश्री दगडू कावळे, गीता चंद्रकांत चव्हाण, कल्पना नरसिंग माळी, पूजा आदिनाथ नावले, पल्लवी किशोर आघाव, पार्वती गणेश रविवाले,गणेश रामहरी मोरे, रुस्तुम दादासाहेब मतसागर
सुरुवातीपासून या प्रकरणाकडे माझे गांभीर्याने लक्ष आहे. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. मतदारसंघात आता पर्यंत पतसंस्थेसह नागरी बँकांनी ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याच्या उघडकीस आले आहे. त्यामुळे ठेवीदारांनी देखील सदरील बँकेचे ऑडिट रिपोर्ट तपासूनच अशा बँकांमध्ये ठेवी ठेवाव्यात.असे आव्हान मी या निमित्ताने करतो..- आमदार रमेश बोरनारे (आमदार तथा मुख्य प्रतोद शिवसेना)