नाचनवेल : कन्नड तालुक्यातील जवखेडा बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेववाडी या शाळेच्या विद्यार्थी आणि पालकांना दररोज चिखलवाट तुडवत शाळेचा रस्ता पार करावा लागत आहे. "चिखलाचा तुडवित रस्ता, शाळेला चल माझ्या दोस्ता" अशी वेळ येथील विद्यार्थ्यांवर ओढवली असून, या रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
गावातील महादेववाडी वस्तीत सुमारे १० ते १५ कुटुंबे वास्तव्यास असून, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जावे लागते. हा रस्ता गौरपिंप्री–पिशोर मार्गाशी जोडला गेला आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी खडीकरण केलेला हा रस्ता आज दयनीय स्थितीत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचतो. दुचाकी वाहतूक अशक्य होते, त्यामुळे शाळेतील सुमारे ५० विद्यार्थी दररोज चिखल तुडवत शाळेपर्यंतचा प्रवास करत आहेत.
रस्त्यावर पडलेले खड्डे, साचलेले पाणी यामुळे वाहने घसरून अपघातांची शक्यता वाढली आहे. काही वेळा एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला दवाखान्यात नेणेही कठीण होते. ग्रामस्थांनी वारंवार निवेदनं देऊनही या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
ग्रामस्थ संजय शिखरे म्हणाले, "रस्त्याबाबत कुणीही गंभीर नाही. फक्त निवडणुकीच्या काळात आश्वासनं दिली जातात. निवडणूक संपली की मात्र सगळं विसरलं जातं. प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येवर उपाय करावा."
मुख्याध्यापक विठ्ठल काचोळे यांनी सांगितले, "आमच्या शाळेत सुमारे ५० विद्यार्थी असून, रस्त्याची अवस्था पाहता मुलं शाळेत यायला टाळाटाळ करत आहेत. यामुळे त्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे."
पालक अंकुश मातेरे यांनी सांगितले, "मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि आमच्या रोजच्या शेतीच्या कामासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. पण सध्या संपूर्ण रस्ता चिखलाने भरलेला असून, मोठी कसरत करावी लागते."
या रस्त्याचे डांबरीकरण मंजूर झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात दुरुस्तीचीही कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे या रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीसाठी आणि शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.