छत्रपती संभाजीनगर : नुकतीच मुख्य बसस्थानकातून नाशिकला जाण्यासाठी ई-शिवाई बसची सेवा सुरू केली आहे. या बसला चार्जिंग करण्यासाठी चार तासांचा ब्रेक देण्यात आला आहे. या ब्रेकसह वाहकांचे कर्तव्य १२ तासांचे होत आहे. त्यांना ओव्हर टाईम मात्र पूर्वीप्रमाणेच पावणेदोन तासांचाच देण्यात येत आहे. या निर्णयामुळे वाहकांत नाराजीचा सूर असून, चार्जिंगदरम्यान ४ तासांच्या ब्रेकमध्ये कराचे तरी काय, या विचाराने वाहक हैराण झाले आहेत.
शिवशाही बस : छत्रपती संभाजीनगरहून .... नाशिक
छत्रपती संभाजीनगर ते नाशिक या मार्गावर साधी आणि शिवशाही बसची सेवा होती. आता शिवाशाही बसची सेवा बंद करून या मार्गावर ई-शिवाई बसची सेवा सुरू केली आहे. पहिली बस छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ६.३० वाजता निघून नाशिक येथे सकाळी १०.३० वाजता पोहोचते. या बसच्या परतीची वेळ मार्गाला दुपारी २ वाजताची वेळ ठरवण्यात आली आहे. ही बस छत्रपती संभाजीनगरला सायंकाळी ६.३० पर्यंत परत येते. या दरम्यान तब्बल वाहकांचे १२ तासांचे कर्तव्य होत आहे.
ओव्हर टाईम पावणेदोन तासाचा
यापूर्वी सकाळी ६.३० वाजता गेलेली गाडी ११ वाजता नाशिक व तेथून लागलीच ११.३० वाजता परतीच्या मार्गाला लागून ती ४.३० ते ५ वाजेपर्यंत शहरात दाखल होत होती. एकंदरीत १० तासांचे कर्तव्य होत असल्याने वाहकांना पावणेदोन तासाचा ओव्हर टाईम देण्यात येत होता. आता जास्त वेळ कर्तव्यावर रहावे लागत आहे. मात्र ओव्हर टाईम मात्र पावणेदोन तासाचाच असल्याने वाहकांत नाराजीचा सूर आहे.
चार तास करायचे काय ?
ई-शिवाई बस अर्ध्या तासात जरी चार्जिंग झाली तरी तिला ठरवून दिलेल्या म्हणजे दुपारी २ वाजेनंतरच प्रवासी भरण्याची तयारी करावे लागते. यामुळे तब्बल चार तास वाहकालाही ताटकळावे लागत आहे. या चार तासांत करायचे काय, असा प्रश्न वाहकांना सतावत आहे.