लालपरीसह सर्वच बसचे मिळणार अचूक लोकेशन pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

MSRTC bus live tracking app : लालपरीसह सर्वच बसचे मिळणार अचूक लोकेशन

एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत व्हीटीएस; आपली एसटी अॅप होणार अपडेट

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एसटी महामंडळाची लालपरी असो वा इतर बस, त्यांचे नेमके लोकेशन (स्थान) शोधण्याची सुविधा प्रवाशांना येत्या एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस) पूर्णपणे अपडेट झाली असून, ती एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या प्रणालीसाठी महामंडळाने आपली एसटी नावाचे स्वतंत्र अॅप विकसित केले असून, त्याद्वारे एसटीचे लोकेशन आता घरबसल्या कळणार आहे, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

एसटी महामंडळाने प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी काळानुरूप बसमध्ये अत्याधुनिक बदल केले आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्वच एसटी बसना व्हेईकल ट्रैकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असलेले आपली एसटी हे अॅप तयार करण्यात आले असून, तूर्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांना हे अॅप डाऊनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील विविध आगारांतून ई-बससह सुमारे ५५० वस सध्या धावत आहेत. या बस नेमक्या कोणत्या मार्गावर आहेत आणि त्या किती वेळात नियोजित ठिकाणी पोहोचतील, याची चाचपणी गेल्या अनेक दिवसांपासून केवळ अधिकारी स्तरावर सुरू होती. त्यातील तांत्रिक उणिवा आता दूर करण्यात आल्या आहेत.

या प्रणालीद्वारे सध्या अधिकाऱ्यांना सर्व बसचे अपडेटेड लोकेशन दिसत आहे. त्यामुळे आता ही सेवा प्रवाशांसाठी खुली करण्याची तयारी वरिष्ठ पातळीवर सुरू असून, एप्रिल महिन्यात ती कार्यान्वित होईल. लवकरच या अॅपचा वापर कसा करावा, याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT