छत्रपती संभाजीनगर : एसटी महामंडळाने १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून सर्वच प्रवाशांना २ रुपये स्वच्छता कर लावला आहे. या दोन रुपयांसाठी प्रवासी वाहकांना ५०० रुपये किंवा १०० रुपयांची नोट देत असल्याने पुन्हा सुट्या पैशाचे वांदे होत आहेत. यात वाहक-प्रवाशांत शाब्दिक चकमकी घडत असल्याने हा चिल्लर वाद वाहकांची डोकेदुखी बनला आहे.
सुट्या पैशावरून वाद होण्याच्या घटनांत वाढ झाल्याने एसटी महामंडळाने प्रथम पाच रुपयांच्या पटीत दरवाढ केली होती. त्यानंतर पुन्हा केलेल्या दरवाढीत एक रुपयाच्या पटीने दरवाढ केली. एक रुपयाच्या पटीत दरवाढ केल्यानंतर वाहक प्रवाशांना पुन्हा वादाला तोंड फुटले होते. त्यावर एसटी महामंडाने वाहकांना १०० रुपयांपर्यंतचे सुटे पैसे देण्याचा तोडगा काढला. अनेकदा सुट्या पैशाच्या अडचणीमुळे वाहकांना ही रक्कमही मिळत नाही. दरम्यान, यात पुन्हा दोन रुपयांची भर पडल्याने वाहकांच्या डोकेदुखीत मोठी भर पडली आहे.
दोन रुपये नाहीत
प्रवासी केवळ ५०० आणि १०० रुपयांचीच नोट देत नाहीत तर काही प्रवासी चक्क दोन रुपये नाहीत, असे उत्तर देत आहेत. दोन रुपयांसाठी प्रवाशांना सेवा दिली नाही तर कारवाईच्या भीतीने काही वाहक खिशात पैसे भरत असल्याची माहिती समोर येत आहे.
...अन् वाहकांचे चेहरे उतरत आहेत
एसटीने लागू केलेला स्वच्छता कर सर्वसामांन्य प्रवाशांसोबत सवलतध-ारकांनाही लागू केला आहे. ज्या सवलतधारकांना मोफत प्रवासांची मुभा आहे, त्यांना दोन रुपयांचे तिकीट घ्यावे लागत आहे. अशा-वेळी हे प्रवासी दोन रुपयांसाठी ५०० किंवा १०० रुपयांची नोट देत आहेत. या नोटा पाहताच वाहकांचे तोंड उतरत आहे. २ रुपयांसाठी ५०० रुपयांचे सुटे द्यायचे तरी कसे, यातच वाहक प्रवाशांत शाब्दिक चकमकी घडत आहेत. यावर एसटीच्या अधिकाऱ्यांनी तोडगा काढावा, अशी चर्चा वाहकांत सुरू आहे.