Crime News : सातारा गावात महावितरणच्या पथकाला शिवीगाळ करत धमकावले file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : सातारा गावात महावितरणच्या पथकाला शिवीगाळ करत धमकावले

प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न; वीज मीटर तपासणी मोहिमेत अडथळा ; चौघांविरुद्ध सातारा पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

MSEDCL team abused and threatened in Satara village

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : थकीत वीज बिल वसुली आणि संशयास्पद वीज मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरणच्या भरारी पथकाला अडवून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. आमच्या घरात का घुसलात, तुम्ही फक्त विशिष्ट समाजाच्या घरचे मीटर चेक करता का? असा जाब विचारत प्रकरणाला थेट धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार मंगळवारी (दि. ३) दुपारी दीड वाजेच्या सुमारास सातारा गावातील सदानंद नगर चौक येथे घडला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अरिफा बि शेख कय्युम पटेल (५५), शेख कय्युम पटेल (७०), आल्ताफ कय्युम पटेल (३०), अश्फाक शेख कय्युम पटेल (३५, सर्व रा. गट नं. ३, सदानंद नगर, सातारा परिसर) अशी आरोपींची नावे आहेत.

महावितरणच्या छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन चंदनमोरे (५३) हे मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पथकासह सातारा परिसरात थकीत वीज बिल वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेवर होते. त्यांच्यासोबत पडेगावचे शाखा अभियंता प्रदीप निकम, नक्षत्रवाडीचे शाखा अभियंता नाथाभाऊ जाधव, तांत्रिक कर्मचारी पाडसवान, जाधव, महिला तांत्रिक कर्मचारी भारती जाधव व इतर कर्मचारी होते.

दिवसभरात विविध ग्राहकांकडे कारवाई करत दुपारी १:३० वाजेच्या सुमारास हे पथक सातारा गावातील गट क्रमांक ३. सदानंद नगर येथील ग्राहक अरिफा बि शेख कय्युम पटेल यांच्या घरासमोर पोहोचले. संबंधित ग्राहकाच्या घरात आणखी तीन अतिरिक्त वीज मीटर असल्याची खात्रीशीर माहिती महावितरणच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे मीटरची तपासणी करत असतानाच, घराच्या मालकीण अरिफा, त्यांचे पती शेख कय्युम पटेल, मुलगा आल्ताफ पटेल आणि अष्फाक पटेल हे चौघेही खाली आले.

त्यांनी थेट अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत, तुम हमारे घरमे क्यूं घुसे, तुम हमारे घरके मीटर क्यू लेके जारे? असा आरडाओरड सुरू केला. भररस्त्यात त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. महिला कर्मचाऱ्याचा हिसकावला मोबाईल !

आरोपी शेख कय्युम याने, तुम सिर्फ हमारे समाज के घरकेही मीटर चेक कर रहे है, हम वो करणे नहीं देंगे असे ओरडत मोहिमेला उघडपणे धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली. त्याच वेळी पथकातील महिला तांत्रिक कर्मचारी भारती जाधव यांच्या हातातील मोबाईल अरिफा हिने त्यांच्या अंगावर धावून जात ओढून घेण्याचा प्रयत्न केला व त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून शासकीय पथकाने कोणताही वाद न वाढवता कारवाई थांबवून थेट सातारा पोलिस ठाणे गाठले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निर्मला राख करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT