MP Bhumre driver Javed missing since second day of inquiry
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: खा. संदीपान भुमरे आणि आ. विलास भुमरे यांचा वाहन चालक जावेद शेखच्या नावावर सालारजंगची जालना रोडवरील दाऊदपुरा भागातील तब्बल १५० कोटींची जमीन हिबानामा (गिफ्ट) करून दिल्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेत ३० जूनला नऊ तास चौकशी झाली.
३५ प्रश्नांपैकी एकाचेही समाधानकारक उत्तरे न दिल्याने पुन्हा चौकशीला बोलविले होते. मात्र तब्येतीची कारणे सांगून त्यांनी पाच दिवसांचा अवधी घेतला होता. मात्र तेव्हापासून जावेद चौकशीला आलाच नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हिबानामा करून देणारे हैदराबादचे मीर महेमूद यांची बुधवारी (दि.९) आर्थिक गुन्हे शाखेने दिवसभर कसून चौकशी केली. २५ प्रशांपैकी एकाचेही उत्तर समाधानकारक न दिल्याने गुरुवारी पुन्हा कुटुंबासह चौकशीला बोलावण्यात आले आहे.
हैदराबादच्या सालारजंग कुटुंबातील वंशज मीर महेमूद अली खान यांच्या नावावर संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे कोट्यवधींची जमीन खा. भुमरे यांचा चालक जावेद शेखला हिबानामा (गिफ्ट) करून दिली. जा गेवर स्वतःच्या नावाचा फलक लावून जावेदने ताबाही घेतला.
परभणीचे वकील मुजाहिद जमिनीवर गेले तेव्हा भुमरे साहेबांचा चालक म्हणून सांगत, जमीन त्याच्या नावावर हिबानाम्याने करण्यात आल्याचे जावेदने सांगितले आणि विरोध केल्यास धमकी दिली होती. हा हिबानामा ९ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये भुमरे यांनी मंत्रिपदाचा वापर करून स्टॅम्प ड्यूटी बुडवून जमीन घेतल्याचा आरोप मुजाहिद यांनी केला होता. भुमरे यांनी वकील मुजाहिद यांना जमिनीचा नाद सोड, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. जावेद शेख यांनी मात्र नवाब कुटुंबाशी असलेल्या कौटुंबिक संबंधांमुळे जमीन मिळाल्याचे सांगत, भुमरे कुटुंबाचा यात काही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार अर्ज दिल्यानंतर चौकशीला जावेद यांनी एक वेळा पोलिसांकडे हजेरी लावली होती. त्यानंतर चौकशी कासवगतीने सुरू होती. मात्र, माध्यमांनी प्रकरण लावून धरल्यानंतर पुन्हा जावेद यांची पोलिस निरीक्षक संभाजी पवार, एपीआय मोहसीन सय्यद यांनी ३० जूनला दिवसभर चौकशी झाली.
मात्र त्यानंतर जावेदने तब्येत ठीक नसल्याचे कारण पुढे करून पाच दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, नऊ दिवस झाले तरी जावेद चौकशीला आर्थिक गुन्हे शाखेत फिरकला नसल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. दरम्यान, मीर महेमूद बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीला हजर झाले. एपीआय मोहसीन सय्यद यांनी दिवसभर कसून चौकशी केली. मात्र त्यांनी एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले नाही. गुरुवारी पुन्हा कुटुंबातील पाच सदस्यांसह चौकशीला पोलिसांनी बोलावले आहे.