Mother Dies Due to Doctors' Negligence at Bajaj Hospital
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये प्रसूतिपूर्व गरोदर महिला व बाळ दोघेही सुरक्षित असल्याचे सांगत डॉक्टरांनी सिझेरियन शस्त्रक्रिया केली. मात्र, यानंतर दहा दिवसांतच या २३ वर्षीय मातेचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणी तीन महिन्यांनंतर अखेर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ समितीनेही उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत हा मृत्यू टाळता आला असता, असा निष्कर्ष नोंदविला आहे. हे विशेष.
याप्रकरणी कार्तिक वाघचौरे (रा. गारखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्त्रीर-ोगतज्ज्ञ डॉ. प्रेरणा आनंद देवधर (रा. उस्मानपुरा) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची पत्नी ऋतुजा ही चार वर्षांपासून संबंधित डॉक्टरांकडे उपचार घेत होती. २३ मार्च २०२५ रोजी गर्भधारणा झाल्यानंतर नियमित तपासण्या व सोनोग्राफी करण्यात येत होत्या. प्रत्येक वेळी आई व बाळ सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.
३ व १२ डिसेंबरच्या तपासणीनंतरही सर्व काही सुरळीत असल्याचे सांगण्यात आले; मात्र नॉर्मल डिलिव्हरी होणार नसल्याचे सांगून १४ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. १५ डिसेंबर रोजी सुमारे ४-५ तास चाललेल्या सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर मुलाचा जन्म झाला. कुटुंबीयांना आई सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी ऋऋतुजाने अंगावर लाल चट्टे, लघवी कमी होणे, ताप व सूज असा त्रास सुरू झाल्याचे सांगितले. याबाबत डॉक्टरांना वारंवार माहिती देऊनही सिझेरनंतर होते असे सांगत दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. २० डिसेंबर रोजी सुट्टी दिली. तेव्हा चट्टे व लघवी कमीच होत होती.
त्रास वाढल्याने २३ डिसेबर २०२५ पत्नीला पुन्हा रुग्णालयात दाखल केले. आयसीयूमध्ये भरतीच्या वेळी ऋतूजा बोलत होती, असे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी व्हेल्टीनेटर लावले, डायलिसिस करावे लागेल, असे सांगितले.
त्यानंतरही दुपारी २ वाजता पत्नीचा मृत्यू घोषित करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी पतीने दिलेल्या अर्जावर चौकशीसाठी नियुक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ समितीने सर्व कागदपत्रांचा अभ्यास केल्यानतंर, रुग्णाचा मृत्यू टाळता येण्यासारखा होता. उपचारादरम्यान डॉक्टरांकडून हलगर्जीपणा व निष्काळजीपणा झालेला आहे. या निष्कर्षानंतर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे हे पुढील तपास करत आहेत.
एमएलसी, पोस्टमार्टम टाळल्याचा आरोप
या मातेच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाने एमएलसी, पोस्टमार्टम केले नाही आणि नातेवाईकांनाही करू दिले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे मृत्यूचे खरे कारण दडपल्याचा संशय व्यक्त केला आहे. दुसरे म्हणजे कार्डिओलॉजिस्टने पेरी पार्टम कार्डिओमायोपॅथीचे निदान केल्याचा दावा आहे; मात्र वेळेत उपचार न झाल्यामुळे स्थिती गंभीर झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
उपचारातील गंभीर त्रुटी
एमसीटीएस नोंद न घेणे
सिझेरपूर्व आवश्यक तपासण्या टाळणे
संसर्ग, ताप व लक्षणांकडे दुर्लक्ष
चुकीची इंजेक्शन्स व औषधे
तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेणे
व्हॉट्सअॅवपवरून उपचार देणे
माता मृत्यूपत्रावर संशय.
राज्य महिला आयोगाकडून दखल
या प्रकरणी पतीच्या तक्रारीवर तातडीने व कायदेशीर कार्यवाही करावी, अशा सूचना राज्य महिला आयोगाकडून घाटी अधिष्ठातांना फेब्रुवारी महिन्यात केल्या होत्या. तसेच कार्यवाहीचा चौकशी अहवालही पाठवण्याचे निर्देश दिले होते.