Mixed response to Vanchit Bahujan Aghadi's bandh
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि.२३) महाराष्ट्र बंदच हाक दिली होती. याचाच एक भाग म्हणून शहरातही बंद पुकारला होता. दरम्यान, पैठणगेट ते सिटी चौक परिसरातील व्यापाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही काळ बंद पाळला. शहरात इतर भागांत मात्र सकाळपासून व्यवहार सुरळीत सुरू होते.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी महाराष्ट्र बंद पुकारला होता. या पार्श्वभूमीवर शहरातील जिल्ह्यातील सर्व नागरिक, सामाजिक संघटना, व्यापारी, शैक्षणिक संस्था, कामगार, युवक आणि विविध घटकांनी शांततामय व लोकशाही मार्गाने या बंदमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांप्रती ऐक्य दाखवावे, असेही आवाहन केले होते. सकाळीच वंचितचे पश्चिम जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पैठणगेट ते सिटी चौक परिसरातील व्यापाऱ्यांना बंद पाळण्याचे आवाहन केले. याला तेथील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला.
काही काळ या ठिकाणी वंचितच्या वतीने ठिय्या आंदोलनही करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, हा परिसर वगळता इतर परिसरात मात्र सकाळपासूनच व्यवहार सुरळीत होते.
पब्लिकन विद्यार्थी सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, एसएफआय, प्रहार संघटना, बुद्धिस्ट फाउंडेशन या संघटना आंदोलनात सहभागी होत्या. यावेळी सचिन निकम, प्रशांत बोराडे, अमोल दांडगे, लोकेश कांबळे, मिलिंद मोकळे, कुणाल राऊत, संदिप तुपसमुद्रे, संदीप अहिरे, कुणाल भालेराव, माधुरी तायडे, अरविंद भुक्तर, सुधीर जगतापासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.