Minor girl sexually assaulted after being drugged; two waiters arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आणि तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
किशोर विलास सोळुंके (२०) आणि कृष्णा अवचितराव सोळुंके (२५, दोघेही रा. चिमणापूर, ता. कन्नड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही आरोपी टीव्हीसेंटर परिसरातील एका बारमध्ये वेटर म्हणून काम करतात. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी पीडित मुलीची एका तरुणाशी ओळख झाली होती. त्या तरुणाने त्याचा मित्र किशोर साळुंके याचा मोबाईल नंबर पीडितेला दिला होता. १ जून २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास किशोरने पीडितेला टीव्हीसेंटर भागात भेटायला बोलावले. तिथून त्याने तिला जवळच असलेल्या स्वतःच्या खोलीवर नेले. खोलीवर गेल्यानंतर पीडितीने नकार देऊनही किशोरने तिला जबरदस्तीने गुंगीचे औषध मिसळलेले शीतपेय पाजले. पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर किशोरने तिच्यावर अत्याचार केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला तिच्या घराच्या परिसरात आणून सोडले.
या घटनेदरम्यान आरोपींनी मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढले होते. त्यानंतर काही दिवसांनी पीडित मुलीच्या एका नातेवाईक महिलेला अज्ञात क्रमांकावरून फोन आला. तुमच्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो माझ्याकडे असून, २० हजार रुपये न दिल्यास ते सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी दिली. खात्री पटावी म्हणून आरोपीने व्हॉट्सअॅपवर एक फोटोही पाठवला. या प्रकारामुळे कुटुंबीय प्रचंड घाबरले. त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता संपूर्ण भयानक प्रकार उघडकीस आला. यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.