छत्रपती संभाजीनगर : घरासमोर लग्नाचा मंडप सजलेला... नातेवाईक आणि वऱ्हाडी मंडळी सजून-धजून पंगतीची वाट पाहत बसलेली... आतल्या खोलीत नवरीची लगबग सुरू होती. काही क्षणांतच नवरा-नवरी बोहल्यावर उभे राहणार आणि मंगलाष्टकांचे सूर घुमणार, तोच बाहेर पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजला! चाईल्ड हेल्पलाईनचे कर्मचारी आणि दामिनी पथकाने थेट मंडपातच धडक मारली अन् वऱ्हाड्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
एका सजग नागरिकाच्या तत्परतेमुळे सातारा परिसरात रविवारी (दि. २६) पाचवीत शिकणाऱ्या अवघ्या १३ वर्षीय चिमुकलीचा बालविवाह ऐनवेळी टळला. सातारा परिसरात रविवारी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मात्र अवघ्या १३ वर्षांच्या मुलीचे लग्न होत असल्याची कुणकुण परिसरातील एका सजग नागरिकाला लागली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट चाईल्ड हेल्पलाईन आणि पोलिसांच्या मदामिनी पथकाला माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून दामिनी पथकाच्या प्रमुख, पोलिस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी उपनिरीक्षक लता जाधव, महिला अंमलदार दिवे, नागलोत, खैरे, कुंडारे, चंद्रे, गवळी आणि जिल्हा बाल संरक्षण समितीचे कर्मचारी नितेश दुवे यांच्या पथकाने थेट विवाहस्थळी धाव घेतली.
पोलिस येताच वऱ्हाडींची उडाली भंबेरी
पोलिस मंडपात पोहोचले तेव्हा वऱ्हाडी मंडळी नवरा-नवरीची वाट पाहत होती, तर आतल्या खोलीत नवरीचा मेकअप अंतिम टप्प्यात होता. पोलिसांनी थेट मंडपात एन्ट्री मारत हा बालविवाहाचा डाव उधळून लावला. पोलिसांना अचानक समोर पाहताच वऱ्हाड्यांची एकच धावपळ सुरू झाली आणि मोठा गोंधळ उडाला. याप्रकरणी दोन्ही कुटुंबीयांना बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून, सातारा पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.
खेळण्या-बागडण्याच्या वयात या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्याची वेळ केवळ गरिबीमुळे आली होती. मुलीचे वडील हमाली करतात, मात्र त्यांना दारूचे भयंकर व्यसन जडले आहे. त्यामुळे कुटुंबाचा संपूर्ण गाडा आईच्या खांद्यावर आहे. ती बांधकाम साईटवर मजुरी करून तीन लेकरांच्या पोटाची खळगी भरते. गरिबी पाचवीला पुजलेली असतानाच, पुण्यात एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या नात्यातीलच एका २५ वर्षीय तरुणाचे स्थळ चालून आले. मुलगा नोकरीला आहे, एवढाच विचार करून आईने पाचवीत शिकणाऱ्या लेकीला संसाराच्या ओझ्याखाली ढकलण्याचा निर्णय घेतला होता.