Mayor interacts with solid waste management team at Siddharth Udyan
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर स्वच्छतेसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन करत महापौर समीर राजुरकर यांनी बुधवारी (दि.२५) सिद्धार्थ उद्यान येथे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आयईसी पथकाशी संवाद साधला. या मार्गदर्शनपर बैठकीत शहरात प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्यासाठी त्यांनी विशेष सूचना दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना कचरा वर्गीकरण, प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता याबाबत प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले.
महापालिकेकडून शहरातील कचरा वर्गीकरण, प्लास्टिक बंदी आणि स्वच्छतेबाबत मोठ्याप्रमाणावर जनजागृती केली जात असून, महापौर समीर राजुरकर यांनी बुधवारी सिध्दार्थ उद्यान येथे घनकचरा व्यवस्थापन पथकाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वच्छता उपक्रमांना अधिक परिणामकारक करण्यासाठी आयईसी पथकाने नागरिकांशी थेट संपर्क साधून जागृती वाढवावी, असे निर्देश महापौरांनी दिले.
स्वच्छ शहर ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे सांगत त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रेरित केले. बैठकीदरम्यान शहरातील विविध भागांमध्ये जाऊन घराघरांत कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्यावरही भर देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी गोविंद केंद्रे, कीर्ती शिंदे, सिद्धार्थ साळवे, नंदलाल गवळी, नंदकिशोर भोंबे आणि विजय पाटील यांची उपस्थिती होती.
जनजागृती मोहिमेला नवे बळ
शहरात स्वच्छता मोहिमेला अधिक चालना देण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. आयईसी पथकाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत कचरा वर्गीकरण, ओला-सुक्या कचऱ्याचे विभाजन आणि प्लास्टिक वापर कमी करण्याचे संदेश पोहोचवले जात आहेत.