Master Fulambrikar perform Vande Mataram song National Anthem
उमेश काळे
छत्रपती संभाजीनगर : भारतीय स्वातंत्रलढ्यात प्रेरणादायक ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताला शुक्रवारी (दि. 7) दीडशे वर्ष पूर्ण होत असून, यानिमिताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हे गीत राष्ट्रगीत होण्यासाठी महाराष्ट्रातील थोर संगीतकार, गायक मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी प्रयत्न केले होते, तसेच त्यांनी या गीताला सर्वप्रथम चाल लावली होती, असा इतिहास आहे.
1934 साली पुणे येथील प्रभात फिल्म कंपनीत चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या संमतीने फुलंब्रीकरांनी स्टुडिओमध्ये ‘वंदे मातरम्’ या गीतास राष्ट्रगीताच्या दृष्टिकोनातून चाल देण्याचे विविध प्रयोग केले. भूप, पहाडी अशा प्रचलित रागाचा त्यासाठी वापर केला. परंतु त्यांचे समाधान होईना. शेवटी सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांना सांघिकरीत्या सहजपणे गाता येईल असा मुख्यत्वे मंद्र व मध्य सप्तकात गायला जाणारा झिंझोटी हा राग त्यांनी निवडला आणि वंदे मातरम्ची चाल निश्चित केली.
प्रभात स्टुडिओत त्यांचे ध्वनिमुद्रणही केले. 1936 साली झालेल्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी गायलेल्या वंदे मातरम्ची ध्वनिमुद्रिका स्वातंत्र्यपूर्व भारताचे राष्ट्रगीत म्हणून प्रथम वाजवली गेली होती, अशी नोंद आहे. त्यावेळी देशात ब्रिटिशांची राजवट होती. मास्टर फुलंब्रीकर हे जेथे जेथे कार्यक्रमाला जात, तेथे वंदे मातरम् सादर करत. मास्टर फुलंब्रीकर यांच्या संपूर्ण जीवनाकार्याची माहिती देणाऱ्या वेबसाईटवर यासंबंधी प्रकाश टाकण्यात आला आहे. मास्टरजींची नात प्रिया फुलंब्रीकर यांनी मास्टरजींच्या जीवनकार्याचा उजाळा देणारे काही प्रसंग या प्रतिनिधीशी बोलताना नमूद केले.
1937 साली पुुण्यातील टिळक स्मारक मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट अशा थोर नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मास्टरांनी झिंझोटी रागातील ‘वंदे मातरम’्् संपूर्ण कडव्यांसह सादर केले. या कार्यक्रमात ग. वि.केतकर यांच्या पुढाकाराने मादाम कामाचा आद्य वंदे मातरम् ध्वज वाजत गाजत आणण्यात आला होता. या चालीने प्रभावित झालेल्या सावरकरांनी मास्टरांचे कौतुक केले तसेच ल. ब.भोपटकर यांनी सत्कार केला, अशी बातमी त्यावेळी केसरी दैनिकात प्रसिद्ध झाली होती. सरोजिनीदेवी नायडू या फुलंब्रीकरांचा उल्लेख वंदे मातरम्वाले मास्टर कृष्णराव असे करत.
1941 साली मुंबई येथील सेंट झेवियर कॉलेजमध्ये वंदे मातरम्चा सातत्याने करत असलेल्या प्रचार व प्रसार या कार्याबद्दल त्यांचा सरोजीनीदेवींच्या हस्ते सत्कार केला होता. मुंबईत 8 ऑगस्ट 1942 रोजी भरलेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात वंदे मातरम् गीत गायनासाठी मास्टर फुलंब्रीकरांचीच निवड झाली होती. रेडिओवरील एका कार्यक्रमात मास्टरांनी नाट्यपदाला जोडून वंदे मातरम् सुरू करताच ध्वनिक्षेपण तातडीने बंद कर ण्यात आल्याची नोंदही आहे. त्यामुळे संतप्त फुलंब्रीकरांनी त्यानंतर रेडिओवर गाणे सादर करणे सोडून दिले. कालांतरांने 1947 साली गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीमुळे रेडियोने (आकाशवाणी) ने मास्टरांना वंदे मातरम् म्हणण्यास सन्मानपूर्वक आमंत्रित केले. त्यामुळे मास्टरांची आकाशवाणीवरील सांगीतिक कारकीर्दही बहरली.
हा तर सांगीतिक लढा
बकीमचंद्रांचे वंदे मातरम् भारताचे राष्ट्रगीत व्हावे यासाठी पारतंत्र्याच्या काळात इ. स.1934 ते 1946 पर्यंत ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध आणि इ. स.1947 ते 1950 या स्वातंत्र्य मिळालेल्या काळात ह्या गीतास विरोध करणाऱ्या स्वकीयांविरुद्ध मास्टरजींनी प्रखर सांगीतिक लढा दिला, असे मत प्रिया फुलंब्रीकर यांनी नोंदविले. हे गीत राष्ट्रगीत होण्यासाठी प्रयत्नांचा हिमालय उभा करणाऱ्या मास्टरजींनी या गीतास सर्व वयोगटातील सामान्य स्त्री-पुरुष समूहाला एकत्रितपणे एका सूरात सहजपणे गाता यावे अशी झिंझोटी रागात सोपी व सुरेल चाल लावली. स्वातंत्र्यपूर्व काळात 1938 साली ब्रिटिश अधिपत्याखालील रेडिओवर हे गीत आपल्या शास्त्रीय संगीताच्या मैफलीच्या शेवटी गाऊ न दिल्याने मा.कृष्णरावांनी बाणेदारपणे रेडिओवर गाण्यास बहिष्कार टाकला. पुढे 1947 साली स्वातंत्र्य दृष्टीपथात आल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने मुंबई आकाशवाणीने त्यांना वंदे मातरम् सादर करण्यास सन्मानाने आमंत्रित केले. तेव्हा देशभक्त कृष्णरावांनी गुढीपाडवा या हिंदू नववर्ष दिनी रेडिओवर वंदे मातरम् गाऊन आपला बहिष्कार मागे घेतला व रेडिओवरील सांगीतिक कारकिर्दीस पुनःश्च प्रारंभ केला. त्याकाळी कलावंतांना सर्व भारतातील रसिकांपर्यंत पोहोचण्याचे व प्रसिद्धी मिळवून अर्थार्जन करण्याचे रेडिओ हे एकमेव माध्यम उपलब्ध होते. परंतु रेडिओवर मिळणाऱ्या प्रसिद्धी व पैशापेक्षा मास्टरजींना आपला देशाभिमान अधिक महत्त्वाचा वाटला. त्यांच्या लढ्याची परिणती म्हणजे 24 जानेवारी 1950 रोजी तत्कालीन भारत सरकारतर्फे या गीतास पूर्णपणे न अव्हेरता निदान राष्ट्रीय गीताचा बहुमान देण्यात आला आणि 26 जानेवारी 1950 या पहिल्या प्रजासत्ताक दिनी हा निर्णय सरकारतर्फे समस्त देशवासियांना कळवण्यात आला, असे फुलंब्रीकर म्हणाल्या.
पु. ल. देशपांडेंकडून गौरव
1953 साली भारत सरकारतर्फे मास्टरांची भारतीय कलावंतांच्या सांस्कृतिक शिष्टमंडळात निवड झाली होती. तेव्हा त्या कलावंत पथकाला चीन येथे भारतीय कला व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांनी स्वचालीतील ‘वंदे मातरम्’ सादर केले. मास्टरांची चिकाटी पाहून त्यांच्या षष्ठयब्दीपूर्ती सोहळ्यामध्ये केलेल्या ध्वनिमुद्रित जाहीर भाषणात पु. ल. देशपांडे म्हणाले होते की, वंदे मातरम्साठी मास्टरांनी घेतलेले परिश्रम पाहून त्यांनाच वंदे मास्टरम् म्हणावेसे वाटते!’
स्वातंत्र्योत्तर काळात अभिनव भारत संघटनेच्या सांगता समारंभात स्वा.सावरकर यांनी मास्तरांना संपूर्ण कडव्यांसहित वंदे मातरम् म्हणण्यास आमंत्रित केले होते. त्या समारंभात 10 मे 1952 रोजी मास्टरजींनी स्वीकृत चालीत व्यासपीठावर संपूर्ण वंदे मातरम् सादर केले. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी य तेजस्वी गीताचा हिरिरीने प्रचार व प्रसार करत होते.
संभाजीनगरशी असलेले नाते
फुलंब्रीकर यांच्या स्मरणार्थ फुलंब्रीतील संत सावता महाविद्यालयातर्फे गेल्या चार वर्षापासून संगीत महोत्सव चालतो. या महोत्सवाच्या आयोजनात सक्रिय असणारे ग्रंथपाल गणेश कुलकर्णी म्हणाले, की मास्टर कृष्णराव हे मूळ संभाजीनगजवळील फुलंब्रीचे रहिवासी. त्यांचे आडनाव पाठक असे होते. परंतु त्यांचे पूर्वज फुलंब्रीहून पुणे येथे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्यासमोर वेद पठणास गेले होते. त्यांचा स्पष्ट मंत्रोच्चार, सुस्वर ऐकून पेशव्यांनी त्यांचा सन्मान केला. तसेच पाठक आडनावाऐवजी फुलंब्रीकर या नावाने आपण ओळखले जाल, असे ते म्हणाले.
तेव्हापासून फुलंब्रीकर घराणे पुण्यात स्थायिक झाले. आळंदी येथे आजोळी 20 जानेवारी, 1898 रोजी मास्टरजींचा मथुराबाईंच्या पोटी जन्म झाला. कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर असे त्यांचे पूर्ण नाव. पण त्यांचे पितृछत्र लवकरच हरपले. बालपणापासून शिक्षणापेक्षा नाट्य, संगीताची अधिक ओढ होती. त्यामुळे त्यांच्या वडील बंधूंनी संगीतकला जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले. भारत सरकारने त्यांना 1971 साली पद्मभूषण पुरस्कार देत गौरविले. हा पुरस्कार मिळविणारे मास्टरजी हे मराठवाड्याचे पहिलेभूमिपुत्र होत, असे कुलकर्णी यांनी सांगितले. जालन्यात मास्टरजीं च्या नावाने सभागृह असल्याची माहितीही त्यांनी दिली.