Market Committee issues cheque of Rs 10 lakhs for Chief Minister's Relief Fund
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या मदतीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल १० लाखांचा निधी अदा करण्यात आला. हा धनादेश बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१०) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
महाराष्ट्रातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. राज्यावर ओढावलेल्या या संकटात बाजार समितीकडून कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे वेतन देत दहा लाख रुपयांचा धनादेश व सभापती राधाकिसन पठाडे यांनी शुक्रवारी त्यांचा वाढदिवस साजरा न करता सर्व कार्यक्रम रद्द करत वाढदिवसासाठीचा खर्च टाळून १,०९,०९१ चा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या भरीव मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना बाजार समितीच्या वतीने बैलगाडी भेट देण्यात आली.
दरम्यान पठाडे यांच्या वाढदिवसानिमित्त लाडसावंगी येथे सरपंच सुदाम पवार यांनी आयोजित केलेला सत्कार पठाडे यांनी नाकारत, त्याऐवजी कपाशीचे जास्त उत्पादन घेणाऱ्या ५१ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बाजार समितीचे संचालक गणेश दहिहंडे, रामबाबा शेळके, दत्ताभाऊ दकिर्डे, मनोज गायके, प्रदीप दहिहंडे, बाळासाहेब पडुळ, रवी पडुळ, सरपंच रमेश शिंदे, उपसभापती आर्जुन शेळके यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकत्यांची उपस्थिती होती.