Water Tanker Pudhari
छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यातील ३८ गावांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा पारा वाढताच पाणी टंचाईने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि लातूर जिल्ह्यांतील तहानलेल्या २६ गावे आणि १२ वाड्या अशा एकूण ३८ गावांना प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या खासगी ३१ आणि १ शासकीय टँकरद्वारे हा पाणीपुरवठा सुरू आहे.

मराठवाड्यात उन्हाळा सुरू होताच दरवर्षी अनेक भागांत पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावतो. नियमित जलस्रोत आटलेल्या गावांची तहान भागवण्यासाठी ग्रामस्थांना टँकरचा आधार घ्यावा लागतो. गेल्या उन्हाळ्यात निम्मा मार्च महिना संपण्यापूर्वीच विभागात अनेक भागांत टँकरची मागणी झाली होती. यात २० ते २२ एप्रिल २०२५ दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यांतील तहानलेल्या एकूण १४२ गावे व २४ वाड्यांना मिळून २१५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.

यंदा मार्च महिन्यात विभागातून कुठूनही टँकर मागणीचा प्रस्ताव आला नाही. परंतु उन्हाचा पारा वाढत गेला आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार गावांतून टँकरची मागणी झाली. आजघडीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७ गावे आणि २ वाड्यांना मिळून १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर जालना जिल्ह्यातील ८ गावे व ९ वाड्यांना १७ टँकरद्वारे, तर लातूर जिल्ह्यातील एका वाडीला एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर मराठवाड्यातील अन्य उर्वरित जिल्हे सुदैवाने अद्याप टँकरमुक्त असल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या अहवालात नमूद आहे.

७४ विहिरींचे अधिग्रहण

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन मराठवाड्यातील परभणी, बीड आणि धाराशिव वगळता अन्य जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १४ एप्रिलच्या अहवालानुसार, मराठवाड्यात एकूण ७४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३८, जालना १३, हिंगोली १३, नांदेड ५, लातूर जिल्ह्यातील ५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यात टँकरसाठी २८ गावातील २२ विहिरींचे, तर टँकर व्यतिरिक्त ४० गावातील ५२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT