Marathwada University action against those colleges
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सक्त ताकीद देऊनही युवा महोत्सवात दांडी मारलेल्या महाविद्यालयांविरुद्ध आता विद्यापीठ प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून या महोत्सवात सहभागी न झालेल्या सुमारे १८९ महाविद्यालयांवर प्रत्येकी १० हजारांचा दंड वसूल करणार आहे. त्याची प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाने सुरू केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवा महोत्सवात ४८४ पैकी ३४६ महाविद्यालयांनी नोंदणी केली, परंतु प्रत्यक्षात २९५ महाविद्यालयांचा सहभाग राहिला. महोत्सवात सहभागी न झालेल्या महाविद्यालयांची संख्या सुमारे १८९ एवढी आहे. या महाविद्यालयाने महोत्सवाला दांडी मारल्याने प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि महोत्सवासाठी विद्याथ्यर्थ्यांकडून आकारलेले शुल्क वसूल करण्यात येणार आहे.
दंडात्मक कारवाईच्या निर्णयानंतरही ६० टक्केच महाविद्यालयांचा सहभाग नोंदवला. या महोत्सवात ३४६ महाविद्यालयांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतु, २९५ महाविद्यालयांच्याच संघांनी सादरीकरण केले. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव जिल्हे येतात. चार जिल्ह्यांत संलग्नीत महाविद्यालयांची संख्या ४८४ पर्यंत आहे. त्यापैकी १८९ महाविद्यालये महोत्सवापासून दूर राहिले.
दंडात्मक कारवाईसह शुल्क वसुली
महोत्सवात सहभागी न झालेल्या महाविद्यालयांकडून प्रत्येकी १० हजार यासह विद्यार्थ्यांकडून महोत्सवाच्या नावाखाली जमा करण्यात आलेले शुल्कही वसूल करण्यात येणार आहे. प्रवेशावेळी प्रत्येक प्रवेशित विद्यार्थ्यांकडून १०० रुपये शुल्क आकारण्यात आले होते.
मंडळाकडून आढावा
विद्यार्थी विकास मंडळाकडून महोत्सवातील महाविद्यालयांच्या ऑनलाइन नोंदणी, प्रत्यक्ष सहभाग याबाबत खातरजमा केली जात आहे. यासह महोत्सवात सहभागी होत असताना रजिस्टर काउंटरला नोंदणी, रिपोर्ट केले जात नाही. त्या नोंदीही विद्यार्थी विकास मंडळाकडून तपासल्या जात आहेत.