Sambhajinagar news : भरपूर पावसानंतरही मराठवाडा तहानलेला file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : भरपूर पावसानंतरही मराठवाडा तहानलेला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११५ टँकर सुरू

पुढारी वृत्तसेवा

Marathwada Remains Thirsty Despite Abundant Rainfall

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मागील हंगामात अतिवृष्टीने विक्रम केले, धरणे, तलाव आणि विहिरी तुडुंब भरल्या; मात्र यंदाच्या कडक उन्हाळ्यात मराठवाड्यावर पुन्हा पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. विशेष म्हणजे, मराठवाड्यात सर्वाधिक तहानलेला जिल्हा म्हणून छत्रपती संभाजीनगर समोर आला असून, येथे तब्बल ११५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या अहवालातून पुढे आली आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर आणि हिंगोली या चार जिल्ह्यांत सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ४ मे २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७१ गावे आणि १४ वाड्यांना ११५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यातील १९ गावे आणि २० वाड्यांसाठी ३८ टैंकर कार्यरत असून, त्यामध्ये दोन शासकीय व ३६ खासगी टँकरचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील दोन गावे आणि एका वाडीसाठी दोन शासकीय टँकर सुरू आहेत, तर हिंगोलीतील एका वाडीसाठी एका शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनतो. यंदाही वाढत्या तापमानामुळे जलस्रोत आटू लागल्याने प्रशासनाकडे टँकरची मागणी वाढत आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यांतील १४२ गावे आणि २४ बाड्यांना मिळून २१५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.

त्याच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात असली, तरी संभाजीनगर जिल्ह्यातील टँकरची संख्या चिंताजनक मानली जात आहे. दरम्यान मराठवाड्यातील परभणी, नांदेड, बीड आणि धाराशिव हे जिल्हे सध्या टँकरमुक्त असल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी वाढते तापमान आणि घटते जलसाठे पाहता आगामी दिवसांत पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धाराशिव वगळता सर्वच जिल्ह्यात विहिरींचे अधिग्रहण

दरम्यान, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन मराठवाड्यातील धाराशिव वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. विभागीय प्रशासनाने आतापर्यंत २६८ खासगी विहिरी ताब्यात घेतल्या असून, त्यामध्ये सर्वाधिक ८७विहिरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. नांदेडमध्ये ५८, बीडमध्ये ३७, जालन्यात ३३, लातूरमध्ये २५, हिंगोलीत २४ तर परभणीत चार विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT