छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : यंदा वरुणराजाने मराठवाड्यावर वक्रदृष्टी केल्यामुळे दुष्काळाचे सावट आहे. पावसाने दडी मारल्यामुळे विभागातील धरणांची पाणी पातळी घसरली आहे. तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका पिकांना बसला आहे. गेल्या १ जून ते ३१ आॅक्टोबर या चार महिन्यात फक्त ४५ दिवसच वरुणराजा बरसल्याची आकडेवारी समोर आली आहे.
गतवर्षी दिलासादायक पाऊस पडल्यानंतर अवकाळी पावसाने देखील एप्रिल आणि मे महिन्यात धुमाकूळ घातला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जुन महिन्यात पावसाला सुरुवात होईल. या आशेने बळीराजाने खरीपाच्या पेरणीला सुरुवात केली. परंतू जून महिन्याच्या शेवटी पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात विभागात ५ ते ७ दिवस पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिन्यात १९ ते २४ दिवस पावसाने हजेरी लावली. तर ऑगस्ट महिन्यात ७ ते ९ दिवस पाऊस झाला. मात्र, सप्टेंबर महिन्यात केवळ १४ ते १६ दिवस पावसाने हजेरी लावली. यामुळे खरीपाचे पिक बळीराजाच्या हातातून निसटले. याकाळात पावसाची वाट पाहत बळीराजाला दुबार पेरणी करावी लागली. पावसाने याकाळात दडी मारल्यामुळे बळीराजाने रब्बीच्या पेरणीला सुरुवात केली. पण ऑक्टोबर महिन्यात देखील मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव आणि हिंगोली चार जिल्ह्यात केवळ एक दिवस पावसाने हजेरी लावली. तर उर्वरीत छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि परभणी हे जिल्हे कोरडेच राहिले.
वरुणराजाची वाट पाहणाऱ्या बळीराजाचा यंदा हिरमोड झाला आहे. १५३ दिवसात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरात १०९, जालना १०७, बीड ११७, लातूर ११०, धाराशिव ११५, नांदेड ९६, परभणी ११०, तर हिंगोलीत १०५ दिवस पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे नांदेडमध्ये ९६ दिवस पाऊस आणि ८१ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये मध्यम आणि तुरळक पावसाची देखील नोंद झाली आहे.
विभागात १ जून ते ३१ आॅक्टोबरपर्यंत ६५ मिमी पाऊस झाला आहे. यात छत्रपती संभाजीनगरात ४६ वेळा, जालना २०, बीड १५, लातूर ११, धाराशिव १०, नांदेड २२, परभणी २० आणि हिंगोलीत १३ वेळा अतिवृष्टी झाली आहे.