Monsoon Rainfall  Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Monsoon | मराठवाड्यात मान्सूनची संथ वाटचाल; २ जुलैअखेर केवळ १८.८ टक्के पाऊस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरीच्या ८९.५ टक्के पाऊस

पुढारी वृत्तसेवा

Marathwada Weather Forecast

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मान्सूनची वाटचाल अद्याप संथच असून २ जुलैपर्यंत विभागात जून ते सप्टेंबर या हंगामातील सरासरीच्या केवळ १८.८ टक्के पाऊस झाला आहे. विभागात आतापर्यंत १२७.६ मिमी पावसाची नोंद झाली असून तो सरासरीच्या ८७.४ टक्के आहे.

जिल्हानिहाय पाहता नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक १४५.४ मिमी (८४.९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. तर बीड जिल्ह्यात सर्वात कमी १२२ मिमी (८९.३ टक्के) पाऊस झाला आहे. जून महिन्यातील सरासरीच्या तुलनेत धाराशिव (९७.६ टक्के) आणि जालना (९२.६ टक्के) या जिल्ह्यांमध्ये तुलनेने समाधानकारक पाऊस झाला, तर परभणी (६५.३ टक्के), लातूर (७०.४ टक्के) आणि हिंगोली (७०.५ टक्के) येथे पावसाची तूट कायम आहे.

२ जुलैच्या अहवालानुसार एका दिवसात सर्वाधिक २६.३ मिमी पाऊस हिंगोली जिल्ह्यात नोंदविण्यात आला. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये १४.३ मिमी, परभणीत १०.६ मिमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये ६.३ मिमी, लातूरमध्ये ५.४ मिमी, जालन्यात ५.१ मिमी, बीडमध्ये २ मिमी आणि धाराशिवमध्ये ०.७ मिमी पाऊस झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत मराठवाड्यात १४३ मिमी पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत ११८.७ मिमी पाऊस झाल्याने मागील वर्षाच्या तुलनेतही पावसाचे प्रमाण कमी आहे. हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून खरीप पिकांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरीच्या ८९.५ टक्के पाऊस ; वैजापूर, फुलंब्री आघाडीवर, खुलताबाद-कन्नडमध्ये तूट

जिल्ह्यात मान्सूनची प्रगती संथ असली तरी काही तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. २ जुलैअखेर जिल्ह्यात १ जूनपासून एकूण १२०.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीच्या ८९.५ टक्के आहे. जून महिन्यात जिल्ह्यात १०७.९ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीच्या ८६.२ टक्के आहे.

तालुकानिहाय पाहता वैजापूरमध्ये सर्वाधिक ११४.३ टक्के, तर फुलंब्रीमध्ये १०३.७ टक्के पाऊस झाला आहे. सोयगाव (९८.१ टक्के), सिल्लोड (९४.६ टक्के), गंगापूर (९३.७ टक्के) आणि पैठण (९१.६ टक्के) येथेही पावसाची स्थिती समाधानकारक आहे. दुसरीकडे खुलताबाद (७०.२ टक्के), कन्नड (७५.६ टक्के) आणि छत्रपती संभाजीनगर तालुका (८१ टक्के) येथे सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

गेल्या २४ तासांत खुलताबाद तालुक्यात सर्वाधिक ३१ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल फुलंब्रीमध्ये १९.९ मिमी, कन्नडमध्ये १७.१ मिमी, सिल्लोडमध्ये १६.५ मिमी, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १५.६ मिमी, वैजापूरमध्ये १० मिमी, गंगापूरमध्ये ९.१ मिमी, सोयगावमध्ये ८.७ मिमी आणि पैठणमध्ये ३.४ मिमी पावसाची नोंद झाली.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. ज्या भागात पेरणी झाली आहे, तिथे पिकांच्या वाढीसाठी आता सातत्यपूर्ण आणि दमदार पावसाची गरज आहे. विशेषतः कमी पाऊस झालेल्या खुलताबाद, कन्नड आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आगामी पावसाकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT