छत्रपती संभाजीनगर : जे.ई. देशकर
मराठवाड्याला निजामाच्या जोखडातून सोडवण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई यांच्या नेतृत्वात मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा झाला. याचे केंद्र हे छत्रपती संभाजीनगर होते. याच मुसीत तयार झालेल्या तरुणांनी पुढे जाऊन तंत्रशिक्षणात डंका वाजवत मराठवाड्यात औद्योगिक क्रांती केली. मुक्तिसंग्रामाप्रमाणेच औद्योगिक क्रांतीचे केंद्र म्हणून या शहराची ओळख आजही कायम असल्याचे मत माजी अधिष्ठाता - उद्योग संस्था, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय प्रा. डॉ. आर. एम दमगीर यांनी व्यक्त केले.
निसर्गाच्या अवकृपेमुळे मराठवाड्यावर मागासचा ठप्पा पडला असला तरी, हा ठप्पा औद्योगिक क्रांतीमुळे पुसला जात आहे. १७ सप्टेंबर १९४८ ला मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. त्यानंतर १९६० ला अभियांत्रिकी महाविद्यालयाची एन्ट्री झाली सुरुवातीला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु २३ वर्षांनंतर म्हणजे १९८३ नंतर मराठवाड्याच्या जिल्ह्या जिल्ह्यात तंत्रशिक्षण पोहचले. उच्च शिक्षण खेड्यापाड्यापर्यंत व परिस्थितीने गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले. खरे तर येथूनच मराठवाड्यात तंत्रशिक्षणाची गंगा वाहू लागली. येथूनच मराठवाड्याची ओळख तंत्रज्ञ, उद्योजक, कुशल करणारा मराठवाडा निर्माण झाली आहे.
सध्याचा शिक्षण प्रणालीमध्ये विविध शैक्षणिक धोरणे राबविली जात असून त्यामध्ये कायद्याचे, वैद्यकीय, समाज विज्ञान, तंत्र विज्ञान, शेतकी, औषधी, वन शिक्षण, खनिज, टेक्सटाईल असे विविध अभ्यासक्रम आहेत. त्यात तंत्रशिक्षण हे अति महत्त्वाचे रोजगार, भांडवल, गुंतवणूक व नोकरी देणारे शिक्षण म्हणून अग्रगण्य आहे. राष्ट्राचा विकास हा तंत्रशिक्षणावर अवलंबून आहे. ज्या देशाचे तंत्रशिक्षण मजबूत असेल, तो देश मजबूत असतो त्याच अनुषंगाने मराठवाडा मजबूत झाला आहे.
निजामाच्या जोखडात अडकलेला मराठवाडा तंत्रशिक्षणाने मुक्त होऊन प्रबळ झाला. अभियंते तंत्रशिक्षण घेऊन बाहेर पडायला लागले. स्थापत्य, यंत्र, विद्युत अभियांत्रिकीतील काही अभियंत्यानी नोकरी पत्करली तर काहींनी स्वतःचे उद्योग निर्माण केले. बांधकाम, यंत्रनिर्मिती, विद्युत उपकरणे, प्लास्टिक, स्टिल, पेपर अशा उद्योगामुळे अनेकांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. यातूनच मराठवाड्याचा चेहरामोहरा बदला.
आर्थिक स्थैर्य - जायकवाडी धरणाच्या निर्मितीमध्ये स्थानिक अभियंत्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच मराठवाडा सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत झाली. अभियंते तसेच सर्व स्तरातील तज्ज्ञ व जनतेच्या योगदानामुळेच मराठवाड्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे.प्रा.डॉ. आर.एम. दमगीर, माजी अधिष्ठाता - उद्योग संस्था, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
मराठवाड्यात सुमारे साडेचार हजार इंडस्ट्रियल युनिट्स आहेत. पैठण, चित्तेगाव, वाळूज, बिडकीन, चिकलठाणा, शेंद्रा येथे औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या. लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी येथून सोयाबीनचे विक्रमी उत्पादन तर जालना, सिल्लोड, कन्नड येथून विक्रमी मक्याचे उत्पादन संपूर्ण देशभरात पुरविले जाते. यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या दोन लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण झाले आहेत. यात तंत्रशिक्षणाचा व उद्योगाचा सिंहाचा वाटा आहे. मराठवाड्याच्या विकासात व मागासलेपण दूर करण्यात तंत्रशिक्षण केंद्रबिंदू ठरले.