नाशिक : जिल्ह्याभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकला गोदामाईला मोठा पूर आला असून, रामकुंडावरील दुतोंड्या मारुती पूर्ण पाण्याखाली गेले आहे.  Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

Flood News | गोदावरी खवळली; मराठवाड्यात पूरस्थिती कायम

नाथसागर धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यावर वरुणराजाची वक्रद़ृष्टी कायम असून, शनिवारी मध्यरात्री अनेक भागाला पावसाने झोडपले. त्यातच जायकवाडी धरणाचे सर्वच्या सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले असून, गोदापात्रात पाणी सोडल्याने पैठणमधील श्रीसंत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या पाठीमागील संपूर्ण भाग, पात्राजवळील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी येथे दोघा जणांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. गोदावरी नदीला पूर आल्याने नाशिकमधील दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेला आहे. तर अहिल्यानगरात भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्ये दुतोंड्या मारुती बुडाला; गोदावरीला पूर

शहर व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. यंदाच्या मोसमातील गोदावरीला आलेला हा नववा पूर असला, तरी प्रथमच रामसेतूसह दुतोंड्या मारुती पाण्याखाली बुडाला आहे. याशिवाय गोदावरी नदीपात्रातील सर्व छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली बुडाली आहेत. शहरासह त्र्यंबकेश्वर तसेच गंगापूर धरण परिसरात तुफान पाऊस कोसळत असल्याने, गंगापूर धरणातून सातत्याने विसर्ग वाढविण्यात येत आहे. जायकवाडी धरणातून सध्या दोन लाख 26 हजार प्रतिसेंकद घनफूट वेगाने पाणी सोडले आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील नदी काठच्या 13 गावांतील नागरिकांना हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

धाराशिवच्या विद्यार्थ्यांची पुरामुळे अडीच महिन्यांपासून शाळा बुडाली

गेल्या अडीच महिन्यांपासून मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिलवडी गावाजवळून वाहणार्‍या राम नदीला पूर आल्याने विद्यार्थ्यांचा शाळेला जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गेल्या अडीच महिन्यांपासून शाळेत जाता येत नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

पुरामुळे बीड जिल्ह्यातील 28 पाणीपुरवठा योजना बंद

गोदावरी व सीना नदीवरील पुरांमुळे अनेक विहिरी गाळाने भरल्या आहेत. तुषार, ठिबक सिंचनाचे पाईप गेल्याने मोठ्या मदतीची शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. बीड जिल्ह्यात पाणी पुरवठा करणार्‍या 28 गावांतील योजना अतिवृष्टीमुळे बंद झाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात पूर; भिंत कोसळून वृद्धेचा मृत्यू

अहिल्यानगर : पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यांतील 100 हून अधिक बंधारे व तलाव फुटले आहेत. जिल्हात रविवारी सकाळी जोरदार पावसाने झोडपल्याने अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जामखेडमध्ये घराची भिंत कोसळून एका वृद्धेचा मृत्यू झाला.

इंदापूर जलमय; शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांचे नुकसान

इंदापूर (जि. पुणे): इंदापूर शहरासह तालुक्यात गेली दोन दिवस सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे शहरातील काही भाग जलमय झाला होता. दुकानांत पाणी शिरल्याने व्यापार्‍यांचे नुकसान झाले आहे, तर शेतकर्‍यांनाही मोठा फटका बसला आहे.

अतिवृष्टीमुळे कसारा घाटात दरड कोसळली

कसारा : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळली असून, यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उंबरमाळी, वाशाळा, लतीफवाडी भागातील भात व वरई शेती वाहून गेली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

उमरीला जलसमाधी आंदोलन

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रोषणगाव येथील संपूर्ण ग्रामस्थांनी रविवारी सकाळी सामुदायिक जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आहे. जवळपास तीनशे लोकांनी आठ तास पाण्यातच राहून संताप व्यक्त केला. दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे, असा ग्रामस्थांचा आरोप होता.

लातूर जिल्ह्यात नद्यांना पूर

लातूर जिल्ह्यातील मांजरा अन् तेरणा नदीला पुन्हा पूर आला आहे. दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन दिवस मांजरा व तेरणा नदीचा ओसरलेला पूर पुन्हा आला असून, दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT