Marathwada has not received any rain for twenty days.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात गेल्या वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे उडीद, मूग, मका, सोयाबीनसह सर्वच पिके अडचणीत सापडली आहे. टंचाईमुळे ऐन पावसाळ्यात विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिवमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी वाढली आहे. टंचाईचे संकट लक्षात घेऊन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागातील सर्व जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
मराठवाड्यात यंदा जून, जुलै या दोन महिन्यांत २० दिवस पाऊस बरसला आहे. त्यामुळे पेरणीनंतर ऑगस्ट या २६ दिवसांत तब्बल २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पिकांची सद्यस्थिती लक्षात घेता मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
पीक सुस्थितीत होते. मात्र, ऑगस्टमध्ये विभागातील सर्वच जिल्हह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. मराठवाड्यात आतापर्यंत २५ दिवसच पावसाने हजेरी लावली आहे. ऑगस्टमध्ये कुठे चार कुठे तीन दिवसच हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. या पावसामुळे मक्याला तुरे आले आहे. तर मूग, उडीद आणि सोयाबीन हे पीकदेखील फुलोऱ्याला आले आहेत.
कापसाच्या पिकाची तीच स्थिती आहे. काही भागांत कापसाला किङघांचा प्रदुर्भाव होत असल्याची स्थित आहे. दरम्यान, या कालावधीमध्ये पिकांना चांगला पाऊस आवश्यक आहे. मात्र, मराठवाड्यात १ ते २६ दरम्यान विभागातील सर्वांत मोठे धरण असलेलेया जायकवाडीचा पाणीसाठा मुबलक असला तरी इतर कोणत्याही धरणात मुबलक पाणीसाठा नाही.
तसेच तळे, बंधारेही कोरडेच आहेत, त्यामुळे सध्या जे पाणीसाठे आहेत. ते पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. या पाणीसाठ्यातून अनधिकृतपणे उपसा होऊ नये यावर लक्ष ठेवण्यासाठी पथके गठीत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
सहा दिवसांत ६३ टँकर वाढले
मराठवाड्यात जून, जुलैनंतर ऑगस्टमध्येही पावसाचा २० दिवसांचा खंड राहिला आहे. त्यामुळे टैंकरद्वारे पाणीपुरवठ्यात वाढ झाली आहे. १९ ऑगस्ट रोजी विभागात ११८ टैंकर सुरू होते. त्यात सहा दिवसांत आणखी ६३ टँकरची भर पडली असून सध्या १८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात संभाजीनगरमध्ये ९० टँकर, जालना २८ टँकर, बीडमध्ये ५४ टँकर, धाराशिव ९ टँकर सुरू आहेत
टंचाई कृती आराखडा करा
मराठ्याडचात पावसाचा खंड वाढला आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहता तत्काळ टंचाई कृती आराखडे तयार करा, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मराठवाड्यात प्रामुख्याने मका, कापूस, मूग, उडीद आणि सोयाबीन हे पिके अडचणीत आहे. सध्या कापूस आणखी १० ते १२ दिवस तग धरेल, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. ऐन फुलोऱ्यात ही स्थिती निर्माण झाल्याने पिकांचे उत्पादन किमान २० टक्क्यांनी घटेल