छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या २९ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज वितरणाला सुरुवात केली जाणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी मतदान तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मराठवाड्यात आतापर्यंत २ लाख ८८ हजार ७८३ मतदारांची नोंदणी झाली असून मागील ९ महिन्यांत ऑनलाईन व ऑफलाईन असे ११ हजारांहून अधिक पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज केले आहेत.
मराठवाडा पदवीधार मतदार संघाची निवडणुकीसाठी मागील वर्षभरापासून विभागीय आयुक्तालयाच्या वतीने आठही जिल्ह्यांत मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू होता. यात १२ जानेवारी रोजी अंतिम केलेल्या यादीत २ लाख ८८ हजार ७९३ मतदार होते. परंतु, राजकीय पक्षांकडून मतदार नोंदणी कमी झाल्याची ओरड करण्यात आली. आयोगाच्या सूचनेनुसार मागील ९ महिन्यांपासून पदवीधर मतदार संघासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पद्धतीने मतदार नोंदणीसाठी अर्ज घेणे सुरू आहे.
दरम्यान, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. दाखल अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी होईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे आयोगाने निश्चित केले आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित मतदारसंघांमध्ये आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संबंधित प्रशासनाला निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी लागणार आहे. निवडणूक कार्यक्रम आणि आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या विभागस्तरीय अध्यक्ष व सचिवांची बैठक बुधवारी (दि.२३) दुपारी २.३० वाजता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीला संबंधित राजकीय पक्षांच्या विभागस्तरीय अध्यक्ष व सचिवांना उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी केले आहे.
१० हजार मतदारांची होणार वाढ
यात आतापर्यंत प्रशासनाला ऑफलाईन ८ हजार ५३७ अर्ज प्राप्त झाले होते. तर ऑनलाईन २ हजार ८०४ असे एकूण ११ हजार ३४१ अर्ज पदवीधरांनी मतदार यादीत नोंदणीसाठी अर्ज दाखल केले. छाननीअंती ९ हजार ९३८ अर्ज पात्र ठरल्याने एवढ्या मतदारांची सुधारित यादीमध्ये वाढ होणार आहे.