Marathwada Graduate Election 2026  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Graduate Election 2026 : पाटील ४८ कोटींचे, तर चव्हाण ३८ कोटींचे मालक

मराठवाडा पदवीधर निवडणूक : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कोट्यधीश, दिलीप घुगेंकडे सव्वा कोटीची संपत्ती

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारांची संख्या मोठी असली, तरी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमधील लढतीकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रतापसिंह पाटील यांची एकूण मालमत्ता ४८ कोटी २४ लाख रुपयांची संपत्ती असून पदवीधरचे सलग तीन वेळापासून आमदार राहिलेले सतीश चव्हाण यांची ३८ कोटी रुपयांची आणि दिलीप घुगे यांची एक कोटी २६ लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार कोट्यधीश आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे रिंगणात ४१ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. या शिल्लक असलेल्या उमेदवारांपैकी सध्या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांच्या संपत्तीचीच चर्चा सुरू आहे.

यात प्रामुख्याने विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दिलेले उमेदवार पाटील यांची संपत्ती अधिक असल्याचे शपथ पत्रात नमूद आकडेवारीवरून दिसत आहे. तर या दोन्ही उमेदवारांपैकी उबाठाचे घुगे हे १ कोटी २६ लाखांचे मालक आहेत. त्यात सोन्याच्या दागिन्यांसह शेत व प्लॉटच्या किमतीचा समावेश आहे.

आमदार चव्हाण यांच्यापेक्षा पाटील यांच्याकडे शेत जमिनीसह प्लॉट आणि रोख रकमेचा समावेश अधिक आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठाच्या उमेदवारांमध्येच खरी चुरस राहील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकावसाय मिळत आहे.

उमेदवारांची जाहीर मालमत्ता, राजकीय अनुभव, संघटनात्मक ताकद, पदवीधर मतदारांशी असलेला संपर्क आणि प्रचाराची रणनीती हे घटक निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे संपत्तीच्या आकडेवारीसोबतच मतदारांचा कोणाला साथ देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चव्हाण २९ कोटींचे मालक

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.) उमेदवार विद्यमान आमदार सतीश चव्हाण हे या मतदार संघात सलग तीन वेळा निवडून आले असून यंदा चौथ्यांदा ते निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्रात पती-पत्नीची ३८ कोटी रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. त्यात १३ कोर्टीचे दागिने, गुंतवणूक, ठेवींचा समावेश आहे. तर २५ कोटींची शेतजमीन, प्लॉट व इतर मालमत्ता आहेत. सद्यस्थितीत ३ लाख २१ हजार रुपये, तर पत्नीकडे ६२ हजार रुपये रोख आहेत. शिवाय पती-पत्नीच्या नावे ६ कोटी रुपयांचे कर्ज आहेत. राजकीय अनुभव आणि यापूर्वीच्या विजयांच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.

पाटील सर्वात श्रीमंत उमेदवार

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) उमेदवार प्रतापसिंह पाटील हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्रात ४८ कोटी २४ लाख रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. यामध्ये ८ कोटी ९० लाख रुपयांच्या जंगम, तर ३९ कोटी ३४ लाख रुपयांच्या स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे २५ लाख रुपये, तर पत्नीच्या नावे २० लाख रुपये रोख असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यांच्या मालमत्तेत महागड्या कारसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचाही समावेश आहे

घुगेंकडे सव्वा कोटीची संपत्ती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी प्रतिज्ञापत्रात एक कोटी १३ लाख रुपयांची स्थावर, तर १३ लाख रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती १ कोटी २६ लाख रुपये आहे. पाटील आणि चव्हाण यांच्या तुलनेत घुगे यांची जाहीर मालमत्ता लक्षणीयरीत्या कमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT