याच ट्रॅक्टरखाली चिरडून अझहरचा जागीच मृत्यू झाला. Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Accident News : मराठवाड्यात तीन भीषण अपघातांत चौघांचा मृत्यू

तुळजापूर, माजलगाव आणि हदगाव येथील दुर्दैवी घटना; एका ठिकाणी जमावाचा उद्रेक, तर दुसरीकडे कुटुंबाचा आधार हरपला

पुढारी वृत्तसेवा

बीड/नांदेड/धाराशिव : मराठवाड्यात गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांनी रस्ते रक्तरंजित झाले आहेत. तुळजापूर (धाराशिव), माजलगाव (बीड) आणि हदगाव (नांदेड) या तीन तालुक्यांत घडलेल्या या अपघातांमध्ये एकूण चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. माजलगाव येथे अपघातानंतर जमावाचा उद्रेक पाहायला मिळाला, तर हदगावमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या एका पित्याचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

माजलगाव : ट्रॅक्टरखाली चिरडून १६ वर्षीय मुलाचा अंत ; जमावाचा उद्रेक

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे एका १६ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. अहाद खान आजहर खान पठाण (वय १६, रा. इंदिरानगर) असे मयत मुलाचे नाव आहे. मंगळवारी (दि. ३) सायंकाळी ७वाजता अहाद गॅरेजचे काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत असताना चिंचगव्हाण रोडवर ही घटना घडली. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला चुकवण्याच्या नादात तो खाली पडला आणि ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. हा अपघात इतका भीषण होता की, यात त्याचा मेंदू बाहेर आला व जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रॅक्टरची तोडफोड करण्यास सुरुवात केली. परिस्थिती चिघळून ट्रॅक्टर पेटवून देण्याच्या बेतात असतानाच पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले आणि पुढील अनर्थ टाळला.

तुळजापूर : महामार्गावर कार खांबावर आदळली; दोन ठार, दोन गंभीर

अपघातात वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

तुळजापूर-सोलापूर महामार्गावर तामलवाडी (जि. धाराशिव) जवळ बुधवारी (दि. ३) पहाटे १.३० च्या सुमारास भरधाव कार लोखंडी खांबावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात सुधाकर विलास गिरे आणि भारत शंकर विटकर (दोघेही रा. मार्डी, जि. सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर याच वाहनातील प्रकाश तानाजी गरड आणि विजय नागेश मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तामलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

हदगाव : मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न भंगले; शेतकऱ्याचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात निवघा बाजार परिसरात एका शेतकऱ्याचा जीप आणि दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. संजय दिगंबर सोळंके (वय ४८, रा. हस्तरा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

संजय सोळंके यांनी मुलांच्या उच्च शिक्षणासाठी गाव सोडून नांदेडला स्थलांतर केले होते. मंगळवारी (दि. २) ते गावी शेतीकाम आटोपून दुचाकीने नांदेडला परतत असताना वामणी पाटी ते मनाठा पाटी दरम्यान एका क्रुझर जीपने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त जीपचे टायर फुटल्याने ती देखील पुढे जाऊन अपघातग्रस्त झाली. या घटनेमुळे एका कुटुंबाचे स्वप्न भंगले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT