छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दोन टप्प्यांत एकूण 52 नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्याचा निकाल रविवार, 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरू होणार असून त्यानंतर पुढील दोन ते अडीच तासांत सर्व निकाल जाहीर होईल, असे नगरपरिषद प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त ऋषीकेश भालेराव यांनी सांगितले.
राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबरअखेरीस राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला होता. त्यात मराठवाड्यातील 52 नगरपरिषदा व नगरपंचायतींचा समावेश होता. मात्र, निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका दाखल झाल्या. त्यामुळे त्या त्या प्रभागातील निवडणुकांना आयोगाने स्वत:च स्थगिती दिली. त्यामुळे नियोजित कार्यक्रमानुसार 2 डिसेंबर रोजी मराठवाड्यातील एकूण 46 नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठीच मतदान होऊ शकले होते. उर्वरित ठिकाणी 20 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले.
आता या सर्व ठिकाणच्या निवडणुकींची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएमच्या मतांची मोजणी होईल. ही मतमोजणी दोन तासांत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यातील बहुतेक नगरपरिषदांच्या निवडणुका या कोरोना काळापासून प्रलंबित होत्या. आता त्या झाल्याने निकालाविषयी उमेदवार, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. यावेळी नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडण्यात येत आहे. त्यामुळेदेखील ही निवडणूक उत्सुकतेची ठरली आहे.
मतमोजणी केंद्रांजवळ तगडा बंदोबस्त
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्ट्रॉंगरूम बनविण्यात आल्या आहेत. जिथे 2 डिसेंबर रोजी मतदान झाले, तिथे तेव्हापासून मतदान यंत्र या स्ट्रॉंगरुममध्ये ठेवण्यात आले आहेत. शिवाय स्ट्रॉंगरुम भोवती तगडा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. आता उद्या मतमोजणीसाठी या बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे.