छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation : ‘आरक्षणाचा घास तोंडाशी, आपली एकजूट कायम राखा’ जरांगे पाटील याचं आवाहन

दिनेश चोरगे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आरक्षण हा मराठ्यांचा हक्क आहे. मराठ्यांच्या नशिबानं आता संधी चालून आली आहे. त्यात संधीचं सोनं करूया. आरक्षणाचा घास लेकरांच्या तोंडाशी आला आहे. त्यात माती कालवता कामा नये. आपल्यात काही मतभेद असतील, तर तूर्तास ते बाजूला ठेवा आणि एकजूट दाखवा, असे आवाहन मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगरातील जाहीर सभेत केले. महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगरातील विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर मंगळवारी मनोज जरांगे यांची जाहीर सभा पार पडली. सभेला लोटलेल्या अफाट गर्दीसमोर जरांगे यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या आंदोलनाची सविस्तर माहिती दिली. आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे. त्यासाठी २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे लढ्याला सुरुवात झाली. आंदोलन लोकशाही मार्गाने आणि शांततेत सुरू होते. तीन दिवस झाले. आंदोलनस्थळी आया बहिणी बसल्या होत्या. अचानक काय झाले, काही कळले नाही. अचानक सर्वांवर भीषण हल्ला झाला. आयाबहिणींची डोकी फुटली. नऊ वर्षांच्या मुलीच्या पायातून गोळी आरपार गेली. एवढे होऊन पुन्हा आमच्यावरच गुन्हे दाखल झाले, पण त्याच वेळी जखमी महिलांनी सांगितले, की दादा रक्त सांडलंय, आता थांबायचं नाही. तेव्हापासून हा लढा तीव्र झालाय. यादरम्यान सरकारची कित्येक शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत येऊन गेली. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही आपली मागणी आहे.

सरकारने आपल्याकडे महिनाभराची मुदत मागितली होती. आपण त्यांना चाळीस दिवस दिलेत. सरकारने समित्या नेमल्यात. मराठ्यांच्या नशिबानं संधी चालून आली आहे. आता तिचं सोनं केल्याशिवाय राहायचं नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

येत्या १४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटीत सभा होणार आहे. त्या सभेला सर्वांनी उपस्थित राहून हा लढा तीव्र करायचा आहे, असे आवाहनही जरांगे यांनी केले. व्यासपीठावर किशोर चव्हाण, सुनील कोतकर आदींची उपस्थिती होती.

भुजबळांवर नाव न घेता निशाणा

मनोज जरांगे पाटील यांनी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. ते (भुजबळ) म्हणतात, मला एकट्यालाच टार्गेट करताहेत, माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मराठा आरक्षणाला विरोध नाही, म्हटले मग संपला विषय. आता पाच दिवस झाले, मी त्यांचे नावही घेतले नाही, पण मराठा समाज किंवा मराठा आरक्षणाला विरोध केलात, तर मी बोलल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला. ते (भुजबळ) म्हणतात, की आमची लोकसंख्या ६० टक्के आहे. चार वर्षांत एवढी लोकसंख्यावाढ कशी झाली? आम्हांला काय वेडे समजता काय? मंडल आयोगाने तुम्हांला १४ टक्के आरक्षण दिले आहे. वरचे आरक्षण आमचे आहे. तुम्ही तुमचे खा, आम्हांला आमचे खाऊद्या, असेही जरांगे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT