Many criminals caught under Operation Yatri Suraksha
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने ऑपरेशन यात्री सुरक्षा व ऑपरेशन अमानत अंतर्गत अनेक गुन्हेगार जाळ्यात अडकवले. या विशेष कामगिरीमुळे रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतची आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे.
विशेष म्हणजे चोरट्यांकडून मिळालेला मुद्देमाल प्रवाशांना परत केला आहे. या मोहिमेत रेल्वे सुरक्षा दलाच्या हाती पाच गुन्हेगार लागले आहेत. त्यांच्याकडून अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
संयुक्त पथकाने १८ फेब्रुवारी रोजी नांदेड रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर प्रवाशांच्या सामानाची चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना दोन संशयितांना ताब्यात घेतले. तसेच त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ओखा रामेश्वरम एक्सप्रेसमधून एक सराईत गुन्हेगार मोबाईल चोरताना रंगेहाथ पकडला. याने यापूर्वीही इतर ट्रेनमध्ये चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. २० फेब्रुवारी रोजी परभणी रेल्वेस्थानकावर तपोवन एक्सप्रेसमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना दोघांना ताब्यात घेतले.
मोबाईल फोन, बॅग किंवा मौल्यवान वस्तू बेवारस ठेवू नका. अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर करू नका. प्रतीक्षागृह, प्लॅटफॉर्म, डब्यांमध्ये संशयास्पद हालचालींबाबत सतर्क राहा, असे आढळल्यास याची माहिती तात्काळ द्या, त्वरित मदतीसाठी १३९ (रेल्वे हेल्पलाईन) वर कॉल करा किंवा जवळच्या आरपीएफ चौकीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१९ हजारांचा ऐवज केला परत
नांदेडच्या रेल्वे संरक्षण दल, रेल्वे पोलिस यांच्या ऑपरेशन अमानत अंतर्गत जालना व नांदेड येथील आरपीएफ कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे हरवलेले सामान तत्काळ शोधून त्यांना परत केले. यात एक १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच ६ हजार रुपये किमतीची मौल्यवान वस्तूंची बॅग संबंधित प्रवाशांना ओळख पटवून परत केली आहे.