Manoj Jarange's criticism of Congress
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हैदराबाद गॅजेटनुसार मराठा आरक्षणासाठी असलेला जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी विजय वडेट्टीवार ओबीसीचा मोर्चा काढत आहेत. मात्र हा मोर्चा खऱ्या अर्थान ओबीसीचा नसून, काँग्रेससाठी रचलेला आहे. ओबीसीच्या नावाखाली काँग्रेसला मोठे करण्याचे काम सुरू असून, ते राजकारणात स्वतःला सेटल करत आहेत, अशी घणाघाती टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी वडेट्टीवार यांच्यावर केली. हे सर्व राहुल गांधींच्या सांगण्यावरून केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
जरांगे यांच्यावर शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांनी रविवारी (दि.५) सकाळी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पुढे म्हणाले, मला विदर्भ आणि खान्देशातील आमच्या कुणबी बांधवांकडून माहिती मिळत आहे की, वडेट्टीवार ओबीसीच्या नावाखाली आपले राजकीय दुकान चालवत आहेत. मात्र विदर्भातील मराठा समाज झपका दाखवण्यासाठी सज्ज आहे. बंजारा समाजाचे आरक्षण खाल्ले, असे बोगस आरक्षण खाणाऱ्यांनी आमच्या आरक्षणाबद्दल बोलू नये, अशी टीका नाव न घेता मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केली.
आमच्या कुणबींच्या मूळ नोंदी आहेत. एकही नोंद रद्द होत नाही; झाली तर सांगतो यांना, असा इशारा त्यांनी दिला. ही परळीची लाभार्थी टोळी आणि येवल्याचा अलिबाबा, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत, अशी टीका त्यांनी नाव न घेता मंत्री पंकजा मुंडे, मंत्री छगन भुजबळ आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केली. मात्र आपल्यापेक्षा हुशार फडणवीस आहेत. त्यामुळे त्यांना लक्ष ठेवावे लागेल. तसेच छगन भुजबळ यांच्या नादी लागून मराठ्यांवर वार केलात, तर तुमचे राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त होईल, असा इशाराही त्यांनी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना दिला.
जरांगे ओबीसी नेत्यांना उद्देशून म्हणाले, १० तारखेला तुम्ही मोर्चा काढत आहात, तर आम्हीही बोगस आरक्षण खाणाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरू. १९९४ च्या आरक्षणाच्या जीआरमध्ये ज्या बोगस जाती ओबीसींमध्ये घातल्या, त्या रद्द करा, अशी मागणी करणार आहे. कारण तुम्ही बॅकवर्ड क्लासमध्ये बसतच नाही.
जरांगे म्हणाले, शेतकऱ्यांचे नुकसान आणि आर्थिक खच लक्षात घेता सरकारने उपाययोजना करावी. जर दिवाळीपर्यंत काही केले नाही, तर राज्यभरातील लोकांना बोलावून सरकार विरोधात मोठे आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.