छत्रपती संभाजीनगर : आपल्या लेकरा-बाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे ही शेवटची लढाई आहे. समाजाची मान खाली जाईल, असे वागू नका. शांतता आणि संयम ठेवा. आरक्षण घेऊनच मुंबईतून बाहेर पडू, असा ठाम विश्वास मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो समाजबांधवांचा महामोर्चा अंतरवली सराटीतून बुधवारी (दि. २७) सकाळी सव्वा दहा वाजता मुंबईकडे रवाना झाला. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जरांगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ शिवनेरी येथे चर्चेसाठी येत असल्याची माहिती आहे. मी चर्चेस तयार आहे, मात्र सर्व मागण्यांची अंमलबजावणी करून जीआर काढल्याशिवाय मागे हटणार नाही. आझाद मैदानावर उपोषण करण्याची कल्पना सरकारला दोन-तीन महिन्यांपूर्वी दिली होती. लेखी कागदपत्रे सर्व कार्यालयांना दिली असूनही अडवणूक केली गेली. आम्हाला थांबवण्यासाठी नवा कायदा काढण्यात आला.
याचिका आणि निकाल एकाच दिवशी देण्यात आला, हा सरकारचा डाव आहे. कोर्टाने सांगितले की, कागदपत्रांची पूर्तता करा, परवानगी द्यायची की नाही हे सरकार ठरवेल. त्यामुळे आता सरकारची खरी भूमिका स्पष्ट होईल. त्यांनी पुढे सांगितले, पोलिसांकडून काही अटी-शर्तींसह आझाद मैदानावर उपोषणाला बसू देणार अशी माहिती आहे. यात सत्यता असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहा कोटी मराठ्यांकडून आभार. आम्हाला अटी-शर्ती मान्य आहेत. मोर्चा निघताना यशवंत होळकर संघटना आणि दलित संघटना यांनी अंतरवली सराटीत येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
सकाळी दहा वाजता अंतरवली सराटीतून ढोल-ताशांच्या गजरात महामोर्चा निघाला. यावेळी मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी व अनेक महिलांनी मनोज जरांगे यांचे औक्षण केले. त्यानंतर अंतरवली सराटी ते वडीगोद्री फाट्यापर्यंत जरांगे यांच्या गाडीवर समाजबांधवांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.
दगडफेक, जाळपोळ न करता शांततेत लढा द्यायचा आहे. जिथे जागा मिळेल तिथे बसा. शांततेच्या मार्गानेच विजय मिळणार आहे. घरी असो, शेतात असो किंवा कामावर असो समाज बांधवांनी मुंबईकडे लक्ष ठेवावे. आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी साथ द्या. डॉक्टर, वकील, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार-खासदार, सर्वपक्षीय नेत्यांनीही आता समाजाच्या मागण्यांना पाठींबा द्यावा. ही शेवटची लढाई आहे, असे जरांगे यांनी आवाहन केले.
महामोर्चा अंतरवली सराटी, शहागड, साष्ट पिंपळगाव, आपेगाव, पैठण, घोटण, तळणी, शेवगाव, पांढरीपूल, कल्याण फाटा मार्गे नारायणगाव व जुन्नर येथे मुक्काम करणार आहे. २८ ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचे दर्शन घेऊन ताफा राजगुरूनगर, खेड मार्गे चाकणच्या दिशेने जाईल. पुढे तळेगाव, लोणावळा, पनवेल व वाशी मार्गे मोर्चा मुंबई गाठेल आणि संध्याकाळी आझाद मैदानावर पोहोचेल. २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू होणार आहे.