छत्रपती संभाजीनगर : पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत आता फळबाग लागवडीकडे वळत आहे. विशेषतः फळांचा राजा आंब्याकडे कल अधिक दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात ८७ हून अधिक हेक्टर क्षेत्रात आंब्याच्या लागवडीची वाढ झाली आहे. मागील काही वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा आणि पारंपरिक पिकांच्या वाढत्या उत्पादन खर्चामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी पर्यायी शेती पद्धतीकडे वळताना दिसत आहेत. यामध्ये फळबागांपैकी विशेषतः आंबा लागवडीला मोठी पसंती मिळत आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आंबा लागवडीसाठी अनुदान मिळते. तसेच अनेक शेतकरी वैयक्तिक खर्चातूनही मोठ्या प्रमाणावर आंब्याची लागवड करत आहेत. आंबा हे पीक शाश्वत उत्पन्न देणारे आणि कमी देखभाल खर्चात चांगला नफा देणारे असल्याने शेतकऱ्यांचा कल त्याकडे वाढत आहे. विशेषतः कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या आंब्याच्या विविध कलमांना शेतकऱ्यांकडून पसंती मिळत आहे. कारण या कलमांमुळे उत्पादनात वाढ होते आणि रोगप्रतिकारक क्षमताही अधिक असल्याने फायदा जास्त होतो, असे शेतकरी सांगत आहेत.
आंबा पिकाला ठराविक कालावधीत फळांची उपलब्धता होते. त्यामुळे शेतकऱ्यांना इतर फळपिकांपेक्षा अधिक उत्पन्न मिळते. यासोबतच कृषी विभागाकडून अनुदान, तसेच केसर आंबा गुणवत्ता केंद्राकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल आंबा लागवडीकडे झपाट्याने वाढत आहे.डॉ. संजय पाटील, प्रमुख, हिमायतबाग फळ संशोधन केंद्र
पावसावर आता भरवसा राहिलेला नाही. एकदा आंबा लागवड केली की अनेक वर्षे उत्पन्न मिळते. त्यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहण्यापेक्षा जास्त काळ उत्पन्न देणाऱ्या फळबागा फायदेशीर ठरत आहेत. कमी पाणी आणि कमी मेहनतीत आंब्याची लागवड फायदेशीर ठरते.मच्छिंद्र जाधव, आंबा उत्पादक शेतकरी