छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा पारा वाढताच वीज गुल झाली तर नागरिक घामाघूम होतात. या वाढत्या तापमानामुळे केवळ नागरिकच नाही तर महावितरणचे ट्रान्सफॉर्मरही घामाघूम होत आहेत. त्यामुळेच त्यांना कुलरचा आधार घ्यावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरला हवा देणारे पंखेही फिके पडत असल्याने पन्नालाल उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरला कुलरची हवा देत उन्हापासून सुटका करण्याचा प्रयत्न करत आहेत.
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मरही वाढत्या तापमानामुळे गरम होऊन नादुरुस्त होत आहेत. उन्हाळ्यात ट्रान्सफॉर्मर गरम होऊन ट्रीप होऊ नये म्हणून त्यांना पंख्याची हवा देण्यात येते, परंतु यावर्षी उन्हाचा कहर वाढत चालल्याने पंख्यांनीही हात टेकले आहेत. त्यामुळेच कुलरच्या गारव्यात ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्याचा प्रयत्न महावितरणकडून करण्यात येत आहे. उन्हामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वीज वहन करणारी यंत्रणाही गरम होऊन कोलमडत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून ट्रान्सफॉर्मरसमोर कुलर लावण्यात आले आहे.
वाळूज एमआयडीसीसह शहराला वीज पुरवठा करण्यासाठी २८ उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. या उपकेंद्रावर सुमारे ३ लाख ५१ हजार १४१ वीज ग्राहक वीज वापरत आहेत. उन्हाचा पारा वाढल्याने सुमारे २५ ते ३० टक्के विजेची मागणी वाढली आहे. वाढत्या विजेच्या मागणीमुळे वीज यंत्रणा प्रमाणापेक्षा अधिक गरम होत असल्याने अनेकदा त्या नादुरुस्त होत आहेत. यावर आळा घालण्यासाठी महावितरणने कुलरचा आधार घेतला आहे.
वाढते तापमान आणि वाढती विजेची मागणी यामुळे अचानक लोड वाढून ट्रान्सफॉर्मर इतके गरम होत आहेत की, त्यातील ऑईल उकळत आहे. यामुळे यंत्रणेवर ताण वाढत आहे. याला मेंटेन ठेवण्यासाठी कुलरचा उपयोग करावा लागत आहे. इतर उपकेंद्रातही कुलर लावण्याची वेळ येणार आहे.
पंखे काम करेना उन्हाळ्यात सहसा ट्रान्सफॉर्मरला पंख्याची हवा देतो, परंतु यंदा उन्हाचा पारा वाढल्याने पंख्याची हवा पुरेशी नाही. त्यामुळे कुलरचा वापर करण्यात येत आहे.- मनीष ठाकरे, अधीक्षक अभियंता