वेरूळ येथील श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Mahashivratri 2025 | १२ ज्योतिर्लिंगापैकी एक वेरूळमधील प्रसिद्ध घृष्णेश्वर मंदिर

Grishneshwar Temple | महाशिवरात्री विशेष-घृष्णेश्वर श्री क्षेत्र वेरूळ

पुढारी वृत्तसेवा
सुनिल मरकड

खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर) - अनादी काळापासून भक्तांच्या हाकेला धावून येणारे व भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे चार धाम सप्तपुरी, ११ ज्योतिर्लिंग यांची यात्रा पूर्ण केल्यावरही ज्यांच्या दर्शनाशिवाय ही यात्रा अपूर्ण राहते आणि दर्शनमात्रे या सर्व यात्रेचे फळ ज्यांच्या दर्शनाने मिळते, असे भगवान घृष्णेश्वर श्री क्षेत्र वेरूळ येथे निवास करतात आणि भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करतात. (Mahashivratri 2025)

घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. संभाजीनगर मार्गे जाताना रस्त्यावर दौलताबाद देवगिरी किल्ला व श्री भद्रा मारुती दर्शन घडते.

छत्रपती संभाजीनगरवरून दर तासाला महानगरपालिकेच्या शहरबस उपलब्ध असतात. वेरूळ महात्म्य अर्थात ब्रम्हसरोवर नामक ग्रंथात विविध युगात असलेल्या वेरुळच्या पुरातन नामांविषयी उल्लेख आहे. कृतयुगात शिवालय, त्रेतायुगात शिवस्थान, द्वापारयुगात एलापूर आणि कलियुगात नागस्थान अशी नावे असल्याचे समजते. नागस्थान म्हणजे वारूळ व वारूळ या शब्दचा अपभ्रंश वेरूळ असा झाला असावा, असे अभ्यासक मानतात. श्री आद्य शंकराचार्यांच्या श्लोकात 'घ्रुश्नेशंच शिवालये' असा उल्लेख येतो. वेरूळ येथे असलेल्या ३४ लेण्या त्यात राष्ट्रकुट राजांच्या लेखात असलेला एलापूर नामक उल्लेख हा वेरूळचाच आहे, असे भांडारकर यांनी सिद्ध केले आहे. महानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याने वेरूळ भूमी पवित्र झाली आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे आजोबा श्री मालोजीराजे भोसले यांचे पाटीलकीचे व वास्तव्याचे स्थान वेरूळ राहिलेले आहे.

भाविकांना रांगेतून जाण्यासाठी नियोजित व्यवस्था

मंदिराची बांधणी

मंदिराचे बांधकाम १५ व्या शतकात मालोजीराजे भोसले यांनी केल्याचे पुरावे आहेत त्यासंबंधीचा शिलालेख आजही मंदिराच्या भिंतीवर आहे. यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचे भव्य काम १७ व्या शतकात केले जे आज आपल्यासमोर आहे. मंदिर लाल अग्निज खडकात असून मंदिराचा अर्धा वरील भाग हा चुना व तत्सम पदार्थ वापरून उभारला आहे. आतील खांबांवर सुंदर नक्षीकाम असून गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील रुद्राक्षाची माला खरी वाटावी इतकी सुंदर आहे. मंदिरात गणपती, अंबिका यांच्या मूर्ती आहेत. शिवपिंड ही पूर्वाभिमुख आहे आणि जुने मुख्यद्वार दक्षिणाभिमुख आहे. जे मंदिर स्थापत्य रचनेत दुर्मीळ आहे. मंदिर अत्यंत भव्य असून केंद्रीय पुरातत्व विभाग अत्यंत सुंदर रीतीने संवर्धन करीत आहे. मंदिराच्या प्रांगणात मोकळी जागा असून भाविक अत्यंत भक्तीभावाने शिव आराधना करतात.

शिवालय तीर्थ

मंदिरापासून साधारण ५०० मीटर अंतरावर वेरूळ येथे शिवालय तीर्थ या नावाने प्रसिद्ध कुंड आहे. हे तीर्थकुंड एक एकर परिसरात असून चारही बाजूने आत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहेत. या कुंडाला एकूण ५६ दगडी पायऱ्या आहेत. या शिवालय कुंडात महादेवाची आठ मंदिरे आहेत. ही मंदिरे भारतातील अष्टतीर्थांची प्रतिकात्मक बांधकामे आहेत, असे सांगितले जाते. यात उत्तरेस काशी, ईशान्येस गया तीर्थ, पूर्वेस गंगा तीर्थ, आग्नेयेला विरज तीर्थ, दक्षिणेस विशाल नैऋत्येस नाशिक तीर्थ, इत्यादी आहेत. महिन्यातील प्रत्येक सोमवारी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ येथे राज्यासह परप्रांतातून दर्शनासाठी हजारो भाविक येतात असतात.

मंदिराचे व्यवस्थापन देवस्थान ट्रस्ट करीत आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश टोपरे यांच्या द्वारे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. महाशिवरात्र उत्सव, श्रावण सोमवार व विविध मुहूर्तावर घ्रुष्णेश्वराची अलंकार पूजा बांधली जाते. सकाळी ५ दुपारी १२ व सायंकाळी ७ वाजता आरती पारंपरिक वाद्यांसह केली जाते. अधिक मासात ७०० ब्राह्मणांच्या सहाय्याने अतिरुद पूजा ५ दिवस अखंड चालते. वर्षभर मंदिरात गर्दी असते. सुनियोजित रांगांमुळे दर्शन सुलभ होते.

महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने घृष्णेश्वर भगवान यांची कथा व महती जाणून घेऊया.

एल नावाच्या राजाची नगरी म्हणून व एलगंगा नावाच्या नदीकाठी वसलेले पुरातन नगर आज वेरूळ या नावाने प्रसिद्ध असले तरी पुराणकथा, स्थानिक विविध पोथी, लोककथा, महानुभाव साहित्य यातून वेरुळच्या विविध कथा आख्यायिका समोर येतात.
- योगेश जोशी अभ्यासक, वेरुळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT