Kerosene file photo
छत्रपती संभाजीनगर

ग्रामीण भागात आजपासून रॉकेलचा पुरवठा

जिल्ह्यासाठी १ लाख ४४ हजार लिटरचा कोटा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : युद्धजन्य परिस्थितीमुळे बहुतांश भागात गॅस सिलिंडरची टंचाई भासत आहे. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागात पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात रॉकेलचा पुरवठा करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी १ लाख ४४ हजार लिटरचा कोटा मंजूर केला आहे. आता या रॉकेलचा पुरवठा उद्या, दि. २४ एप्रिलपासून सुरू होत आहे. डिलरकडून शुक्रवारपासून ग्रामीण भागात वितरकांना हा पुरवठा होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले.

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरातील कच्चे तेल आणि गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून देशात गॅस टंचाई जाणवत आहे. बुकिंग करूनही गॅस मिळण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा अवधी लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात रॉकेलचा पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्रात सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे २०१६ पर्यंत रेशन दुकानांवरून रॉकेलचा पुरवठा होत होता, परंतु त्यानंतर तो बंद करण्यात आला. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी आता ३७४४ किलो लिटर नियतन मंजूर केले आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी १ लाख ४४ हजार लिटरचा समावेश आहे. जिल्ह्याचा पुरवठा पुण्यातील लोणी काळभोर येथील डेपोतून होणार आहे. हा पुरवठा करण्यासाठी डिलरची नेमणूक करण्यात आली असून, आता उद्या शुक्रवारपासून जिल्ह्यात रॉकेल पुरवठ्यास सुरुवात होत आहे. येत्या २७ एप्रिलपर्यंत हा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी रॉकेलचे दरही निश्चित करण्यात आले असून, जिल्ह्यात सरासरी ६३ रुपये लिटरने हे रॉकेल ग्राहकांना मिळणार आहे. रॉकेल परवानाधारकांना पूर्वी प्रतिकिलो लिटर ६७५ रुपये इतके कमिशन दिले जात होते. आता राज्य सरकारने त्यात दुप्पट वाढ करून ते १३५० रुपये इतके केले आहे.

तालुकानिहाय घाऊक आणि अर्धघाऊक विक्रेत्यांना नियतन मंजूर करण्यात आले आहे. आयओसी कंपनीला ऑर्डर दिली असून, उद्यापासून प्रत्यक्ष वितरण सुरू होईल. हे रॉकेल केवळ ग्रामीण भागातच वितरित केले जाणार आहे.
- प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT