महायुतीचा निर्णय स्थानिक पातळीवर दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल : देवेंद्र फडणवीस pudhari news network
छत्रपती संभाजीनगर

महायुतीचा निर्णय स्थानिक पातळीवर दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल : देवेंद्र फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आगामी नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकीत स्थानिक स्तरावर महायुतीबाबत निर्णय होत आहेत. काही ठिकाणी महायुती झाली, तर काही ठिकाणी होणे बाकी आहे. दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे स्पष्ट केले.

विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जागावाटपावरून काहीच वाद नसून जिथे महायुती शक्य आहे तिथेे झाली, कुठे दोन पक्षांची युती, तर कुठे महायुती झाली आहे. या निवडणुकीसाठी स्थानिक स्तरावर निर्णय होत असतात. स्थानिक स्तरावर चर्चा सुरू आहेत. काही ठिकाणी महायुती झाली आहे, तर काही ठिकाणी नाही. जागावाटप वरच्या पातळीवरून होत नाही. ते जिल्ह्यातच केले जाते. त्यामुळे जिल्हा स्तरावर त्या त्या पक्षांनी एकत्र येऊन त्याबाबत निर्णय घेतला आहे. जिथे शक्य आहे, तिथे महायुती झाली आहे. काही ठिकाणी दोन पक्षांची युती झाली असून, काही ठिकाणी युती झालेली नाही. ही राज्याची नव्हे तर जिल्हा स्तरावरची निवडणूक आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय होईल.

महापालिकेतील निकष वेगळे

महापालिका निवडणुकीसाठी वेगळे निकष असतात. जिथे महापालिका असते ती मोठी शहरे असतात. यामुळे महापालिका क्षेत्रात जिथे शक्य आहे, तिथे आमची युती होईल, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही विरोधकांची मातीच होणार

देशात काँग्रेससह विरोधक व्होट चोरी, ईव्हीएमचा मुद्दा सातत्याने मांडत आहेत. परंतु त्यांच्या या फेक नॅरेटिव्हला जनताच उत्तर देत आहे. बिहारमध्ये जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवत विरोधकांचा सुपडासाफ केला. जोपर्यंत विरोधक जमिनीवरील हकीकत आणि जनतेचे प्रश्न समजून घेणार नाहीत, तोपर्यंत त्यांची अशीच माती होत राहणार. हवेत गोळीबार करणार्‍यांना आता जमीन दिसली आहे. त्यामुळे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही विरोधकांची अशीच माती होणार आहे, असे भाकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

जिथे शक्य, तिथे महायुती करणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिथे शक्य तिथे महायुती म्हणून निवडणूक लढवावी, असे आमचे धोरण आहे. जिथे महायुती करायची नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढत व्हावी. असे करताना विरोधात महायुतीतील मित्रपक्षांचे उमेदवार आहेत, हे लक्षात ठेवूनच प्रचार करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असणार आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT