छत्रपती संभाजीनगर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार तर झाला, परंतु अद्याप मंत्र्यांचे खाते वाटपच झालेले नाहीत. मंत्री अतुल सावे आणि मंत्री संजय शिरसाट यांना नेमके कोणते खाते मिळेल, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून उद्योग आणि सामाजिक न्याय यासह इतर खाते मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
शिंदे सरकार असताना जिल्ह्याला दोन-तीन मंत्रिपदे मिळाली होती. तसेच पालकमंत्रीही स्थानिकच होते. मात्र यंदा जिल्ह्याचे एक मंत्रिपद कमी झाले आहे. मात्र असे असले तरी आता या दोन मंत्र्यांना नेमके कोणते खाते मिळेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने चांगले दमदार खाते मिळावे, अशी अपेक्षा जिल्ह्यावासीयांची आहे. तसेच शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही या दोन मंत्र्यांच्या खात्यांकडेच लक्ष लागले आहे. दमदार खाते मिळाल्यास मंत्र्यांसह जिल्ह्याचेही वजन वाढेल, अशी चर्चा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सध्या सुरू आहे. यासर्वांवर आज पडदा पडेल, अशी शक्यता आहे. विस्तारानंतर कोणाला कोणते खाते द्यायचे, याबाबत तिन्ही पक्षांमध्ये एकमत होत नसल्यामुळे विस्ताराची प्रक्रिया लांबल्याची चर्चा आहे. परंतु आता भाजपच्या मंत्र्यांच्या खाते वाटपाबाबतची यादी दिल्लीला गेली आहे. रात्रीतून त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा आहे. तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या खात्यावरही रात्रीतूच निर्णय होणार असल्याने शनिवारी सायंकाळपर्यंत खाते वाटपाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खाते वाटपात जिल्ह्याला उद्योग मंत्री आणि सामाजिक न्याय हे खाते मिळू शकेल, अशी शक्यता आहे.
शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय मंत्रिपदाचे खाते हवे आहे. त्याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींसह मुख्यमंत्र्यांकडेही मागणी नोंदविली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांना कोणते खाते देणार हे आज सायंकाळपर्यंत जाहीर होईल.