छत्रपती संभाजीनगर : थायलंडमध्ये उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून शहरातील २९ वर्षीय घटस्फोटीत तरुणीला चॅटिंग स्कॅम करणाऱ्या कंपनीत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
त्या कंपनीत जबरदस्तीने फसवणुकीचे काम करवून घेण्यात आले. दोन महिन्यांनंतर तिने स्वतःची सुटका करण्यासाठी मोठी रक्कम भरली. भारतात परत आल्यानंतर तिला मुंबई येथील सहार पोलिस ठाण्यात इमिग्रेशन अधिकारी घेऊन गेले. तिथे तिने तक्रार दिल्यानंतर आरोपी अविनाश रामभाऊ उढाण याच्याविरुद्ध गुन्हा नोंद होऊन पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. २७) गुन्हा वर्ग करण्यात आला.
तक्रारीनुसार, २९ वर्षीय तरुणी घटस्फोटानंतर नोकरीच्या शोधात शहरात आली होती. वृत्तपत्रातील जाहिरातीवरून तिची नियुक्ती एफ व्होल्ट या कंपनीत झाली. ही कंपनी शंकरा रेसिडन्सी, उल्कानगरी रोड, गारखेडा येथे कार्यरत आहे आणि तिचा मालक अविनाश रामभाऊ उढाण असा आहे. अविनाश याने महिलेशी ओळख वाढवून थायलंडमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून उच्च पगाराची नोकरी असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने दीड लाख रुपये घेतले, आणि नोकरी निश्चित झाल्याचे सांगून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली विमानतळावरून तिला थायलंडला रवाना केले. महिला बँकॉक विमानतळावर पोहोचताच हरपीत सिंग नामक व्यक्तीने तिला रिसीव्ह करून कंम्पोट (कंबोडिया) येथील क्रिएटिव्ह माईंडसेट नावाच्या कंपनीत नेले. तेथे महिलेला स्कॅमींगचे काम दिले गेले. म्हणजेच बनावट ऑनलाइन चॅटिंग, ग्राहकांची दिशाभूल व डिजिटल फसवणुकीसाठी संदेश पाठवणे. काही दिवसांतच तिला कळले की अविनाश उढाण यांनीच तिला चॅटिंग स्कॅम रॅकेटला विक्री केले आहे. महिलेला या ठिकाणी जवळपास दोन महिने अडकवून ठेवण्यात आले. नंतर तिने २,००० यूएस डॉलर भरून स्वतःची सुटका केली.
सुटका करून भारतात परतली
कंबोडियातील भारतीय दूतावासाच्या मदतीने ती २१ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई विमानतळावर परत आली. तेथे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चौकशी केली. तेव्हा तिने पूर्वकल्पना न देता उढाण याने तिला चॅटिंग स्कॅमच्या कामासाठी थायलंड येथे पाठवले असल्याचे सांगितले.