Long queues for fuel persist for the fourth consecutive day
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सलग चौथ्या दिवशी शुक्रवारी (दि.२२) ही शहरातील पंपांवर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक पंपांवर नो स्टॉकचा बोर्ड कायम असल्याने उन्हातान्हात वाहनधारकांना इंधनासाठी पंपांवर पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, पंपांना नियमित मागणीपेक्षा ३० टक्के अधिकच पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र अतिरिक्त आलेला हा पुरवठा जातो कुठे असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.
शहरासह जिल्ह्यात इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी सुरू आहे. अनेक पंपांवर लांबच लांब रांगा लागत आहेत. आ-लेला स्टॉक लगेच संपत असल्याने रिकाम्या हाती वाहनधारकांना परतावे लागत आहे. तर अनेक पंपांवर साठा संपल्याने बंद केले जात आहेत. नियमित मागणीपेक्षा ३० टक्के अधिकचा इंधन साठा जिल्ह्यात सुरू करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
मात्र प्रत्यक्षात टंचाईच्या झळा कमी झालेल्या नाही. शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी शहरातील अनेक पंप बंद आणि इतर पंपांवर लांबच लांब रांगा असे चित्र होते. उन्हातान्हात इंधनासाठी तासनतास ताटळत थांबावे लागत असल्याने वाहनधारकांकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी शांतता व संयम राखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
रोज स्टॉकची माहिती देण्याचे आदेश
पंपावर इंधनाचा स्टॉक किती आहे. इंधन कधी येणार याची माहिती पंपधारकांनी द्यावी. तसेच पंपांवर दर्शनी भागात फलक लावावे अशा सक्त सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी पंपचालक व तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींना दिल्या..
तेल कंपन्यांसह प्रशासन अपयशी
इंधन टंचाईच्या झळा शहरासह जिल्ह्याभर तीव्र झाल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी वाहनधारक यात होर-पळले जात आहेत. इंधन पुरवठा सुरळीत करण्यात तेल कंपन्यांसह प्रशासनाचे नियोजन कोलमडले आहे. शुक्रवारी अति जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूने, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी ऑइल कंपन्यांचे प्रतिनिधी आणि पंपधारकांची बैठक घेत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.