Campaigning allowed until 10 pm on December 1
रमाकांत बन्सोड
गंगापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धग आता थंडावू लागली असून, प्रचाराच्या रणधुमाळीला अधिकृत ब्रेक लागण्याची वेळ जवळ आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदानाच्या तब्बल २४ तास आधी प्रचारबंदी लागू असते. मात्र यंदा मिळालेल्या विशेष सूटीनुसार मतदानाच्या अवघ्या नऊ तास आधीपर्यंत प्रचार करण्याची मुभा उमेदवारांना देण्यात आली आहे. त्यानुसार १ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता प्रचाराच्या तोफा शांत होणार आहेत.
२ डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार असल्याने १ डिसेंबरची रात्र उमेदवारांसाठी अखेरच्या डावाची संधी ठरणार आहे. मात्र रात्री १० वाजेनंतर ध्वनिक्षेपक वापर, मोर्चे, सभा यांवर निर्बंध येणार असल्याने, उमेदवार अंतिम क्षणापर्यंत रणनीती आखण्यास सज्ज झाले आहेत. अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांची यासाठी लगबग वाढली असून, आखलेल्या रणनीतीनुसार मतदारांशी शेवटपर्यंत संपर्क राखण्याचे प्रयत्न सुरू राहणार आहेत.
दरम्यान मतदानाच्या आदल्या दिवशी मैदानावरील कार्यक्रमांना परवानगी असल्याने, अनेक उमेदवार घराघरांत जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याच्या तयारीत आहेत. शेवटच्या दिवशी संघटनांना अंतिम सूचना, बूथनिहाय समन्वय आणि मतदार याद्यांची पाहणी अशा महत्त्वाच्या घडामोडी होणार असल्याचे सूचित करण्यात येत आहे. याशिवाय मतदान प्रतिनिधी नियुक्तीसंबंधी काही नियम लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक उमेदवाराने आपल्या मतदान प्रतिनिधींची नावे व पत्ते किमान एक दिवस आधी आरओकडे जमा करणे अनिवार्य आहे.
संबंधित प्रतिनिधी हा त्या प्रभागातील रहिवासी असावा आणि मतदारांची अचूक ओळख पटवण्याची क्षमता त्याच्याकडे असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, गुन्हेगारी नोंद असलेल्या व्यक्तींना मतदान प्रतिनिधी म्हणून मान्यता दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वागवाड व सहाय्यक अधिकारी संतोष आगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रचाराच्या जाहिराती, प्रसारण, सोशल मीडिया कॅम्पेनसह सर्व प्रकारचे प्रचारकार्य १ डिसेंबर रात्री १० वाजता थांबवणे बंधनकारक असणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.